नाशिक - निसर्ग चक्रीवादळाच्या प्रभावक्षेत्रामुळे नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात अति वेगाने वारे वाहण्यास आणि पावसाला सुरवात झाली आहे. मंगळवारी मध्यरात्रीपासून नाशिक जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे नाशिकच्या नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केले आहे.
अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने निसर्ग चक्रीवादळ तयार झाले आहे. आता हे वादळ कोकण किनारपट्टीला येऊन धडकले आहे. याचे प्रभाव क्षेत्र ध्यानी घेऊन प्रशासनाच्या वतीने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या वादळाचा परिणाम इगतपुरी, नाशिक, चांदवड, मालेगाव या भागात जाणवू शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे.
नागरिकांनी काय काळजी घ्यावी -
1. 3 व 4 जून रोजी अतिवृष्टीमुळे घरातच सुरक्षित रहावे. घराच्या बाहेर पडू नये.
2. घर नादुरुस्त असल्यास किंवा पत्र्याचे असेल तर तत्काळ दुरुस्ती करावी किंवा सुरक्षित स्थळी आवश्यक साधनसामुग्री सोबत घेऊन स्थलांतरित व्हावे.
3. घराच्या भोवती वादळामुळे विजेचे खांब किंवा तारा, झाडे इ. पडण्याची शक्यता असल्यास त्यापासून लांब रहावे.
4. आपले पशुधन व अन्य पाळीव प्राणी यांना अगोदरच सुरक्षित स्थळी हलवावे किंवा आपल्या सोबत सुरक्षित करावे.
5. आपल्याजवळ केरोसीनवर चालणारे दिवे (कंदिल) बॅटरी, गॅसबत्ती, स्टोव्ह, काडीपेटी या वस्तु ठेवाव्यात.
6. हवामान खात्याकडून मिळणारे इशारे व माहितीसाठी जवळ रेडिओ बाळगावा व त्याद्वारे माहिती घ्यावी.
7. सोबत आवश्यक पिण्याचे पाणी, औषधे जवळ ठेवावे.
8. बाल्कनीमधील हँगिंग किंवा लाइट मटेरियल उदा.फुलांची भांडी, कुंड्या व इतर जड साहित्य तात्काळ सुरक्षित करावे.
9. खराब झालेल्या काचेच्या खिडक्या तत्काळ दुरुस्त करा तसेच दाराच्या पॅनेलची तपासणी करा.
10. वाहनावर झाडे व इतर साहित्य पडू नये यासाठी वाहने सुरक्षित करा. दुचाकी मुख्य स्टँडवर उभी करा.
11. प्रथमोपचार किट, बॅटरी, पॉवर बँक चार्जिंग करून ठेवा. आवश्यक औषधे व रुग्णांची औषधे रुग्णाच्या बेडजवळ ठेवा.
12. विद्युत वाहक तारा तुटल्यास व ट्रान्सफार्मर खराब झाल्यास पर्यायी व्यवस्था करावी. जनरेटरसाठी इंधनाचा पुरवठा असावा.
13. पुरेसे पिण्याचे पाणी साठा करून ठेवा.
14. शुजरॅक चांगल्या प्रकारे बोल्ट कराव्यात, सर्व शूज व इतर वस्तू चांगल्या प्रकारे एकत्र करून सुरक्षित केल्या पाहिजेत.
15. डिश टीव्हीचे उपकरण व्यवस्थित घट्ट करा.
16. एअर-कंडिशनरचे बाह्य युनिट्स पक्के करून घ्या .
17. शेतकऱ्यांनी आपला शेतमाल सुरक्षित ठिकाणी ठेवावा.
18. विनाकारण घराबाहेर पडू नका व अफवांवर विश्वास ठेवू नका.
19. झाडाखाली उभे राहू नका व झाडाखाली वाहने लावू नका.
21. पत्र्यांच्या शेड खाली उभे राहू नका
22. सद्यस्थितीत जिल्ह्यात Home Quarantine असलेले नागरिकांना आवश्यक असल्यास सुरक्षित स्थळे हलविण्याबाबत नियोजन करावे.
अधिक माहितीसाठी व आवश्यक मदतीसाठी आपत्ती व्यवस्थापन कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक 0253-2317151 व 2315080 येथे संपर्क करावा.