नाशिक - उत्तर भारतात पश्चिम चक्रवातामुळे बर्फवृष्टी होत असून तिकडून वाहणाऱ्या वाऱ्यामुळे राज्यातील किमान तापमानात घट होऊन थंडीचा कडाका वाढला आहे. नाशिक जिल्ह्यात निफाड येथील गहू संशोधन केंद्रात 6 अंश, तर नाशिक शहराचा पारा 9.2 पर्यंत घसरला आहे.
उबदार कपडे परिधान करून नागरीक घराबाहेर -
नाशिकमध्ये पंधरा दिवसानंतर मागील दोन दिवसात थंडीचा कडाका वाढला आहे. त्यामुळे नाशिककर सकाळी गुलाबी थंडीचा आनंद घेत आहे. सकाळच्या सुमारास कडाक्याची थंडी पडत असून दिवसभर वातावरणात गारवा जाणवत असल्याने नागरीक गेल्या दोन दिवसांपासून उबदार कपडे परिधान करून घराबाहेर पडताना दिसत आहे. आज 8 फेब्रुवारी रोजी निफाडमध्ये 6 अंश, तर नाशिक शहरात 9.2 अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली.
पारा 2 ते 4 अंशाने घसरण्याची शक्यता -
उत्तर भारतात पुढील चार दिवस पश्चिमी प्रकोपामुळे पाऊस, बर्फवृष्टी, गारपीट होण्याचा अंदाज आहे. अति पश्चिमी प्रकोपाची साखळी उत्तर भारतात सुरू आहे. त्यामुळे पुढील तीन दिवस राज्यातील काही भागात किमान तापमानात दोन ते चार अंशांनी घट होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
हेही वाचा - 'देशाची न्यायव्यवस्था ही सत्ताधाऱ्यांच्या टाचेखाली आहे याविषयी कुणाच्या मनात दुमत नाही'