नाशिक - श्वसननलिकेत अडकलेले 1 रुपयाचे नाणे यशस्वीपणे बाहेर काढून नाशिक जिल्हा रुग्णालयाने एका 9 वर्षीय मुलीला जीवदान दिले आहे. पायल अशोक वराडे (अवळपाडा सुरगणा तालुका) असे या मुलीचे नाव आहे. या मुलीच्या श्वसननलिकेतून जिल्हा रुग्णालयातील अधिकऱ्यांनी 1 रुपयाचे नाणे काढले.
याबाबत अधिक माहिती अशी की, सुरगणा तालुक्यातील अतिदुर्गम अवळपाडा या भागात राहणाऱ्या नऊ वर्षीय पायलने खेळत असताना नकळत एक रुपयाचे नाणे गिळले. त्यानंतर हे नाणे तिच्या श्वसनलिकेत अडकले. तिला त्रास होऊ लागला. तिला खोकला, उलटी व श्वास घेण्यास अडचण येत असल्याने, घाबरलेल्या पालकांनी तिला त्वरित सुरगणा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या रुग्णालयात कान-नाक-घसा विशेष तज्ज्ञ नसल्याने पायला खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथील डॉक्टरांनी तिची परिस्थिती बघून उपचार करण्यास असमर्थता दर्शविली.
रुग्णांच्या नातेवाईकांनी त्यानंतर पायलला नाशिक जिल्हा रुग्णालयात मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास दाखल केले. यावेळी रुग्णालयात हजर असलेले कान-नाक-घसा विशेषज्ञ डॉ. संजय गांगुर्डे, डॉ. शेळके यांनी तत्काळ एक्स-रे काढला. तेव्हा 1 रुपयाचे नाणे श्वसननलिकेत असल्याचे निदर्शनास आले. त्यावेळी डॉक्टरांनी तत्काळ शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. मध्यरात्री दीडच्या सुमारास डॉ. संजय गांगुर्डे व डॉ शेळके यांनी दुर्बिणीद्वारे श्वसनलिकेत अडकलेले नाणे बाहेर काढून पायलला जीवदान दिले.