नाशिक - काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने 50 वर्षांच्या काळात जनतेशी खोटारडेपणा केला आहे. सटाणा येथे झालेल्या प्रचार सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आघाडीवर जोरदार टीका केली. आघाडी सरकारने सिंचनातून आपल्या तिजोरी भरल्या. या उलट युती सरकारने जलयुक्त शिवार सारख्या वेगवेगळ्या सिंचन योजनांतून राज्यातील सिंचन प्रकल्प पूर्ण केले.
राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आघाडीची वाटचाल पराभवाकडे होत आहे. पराभवाचे खापर आपल्या माथी फुटू नये, म्हणून काँग्रेस नेते राहुल गांधी बँकॉकला निघून गेले. जनतेने काँग्रेस-राष्ट्रवादीची दयनीय अवस्था केली आहे. शोले पिक्चरमधील जेलर सारखी 'आधे इधर, आधे उधर, बाकी मेरे पिछे' अशी शरद पवारांची अवस्था झाली आहे, अशी टीका फडणवीस यांनी केली.
हेही वाचा - नाशिक ते पुणे 'उडान' सेवेला हिरवा कंदील.. लक्ष्मीपूजनापासून विमानवाहतूक होणार सुरू
विकासाला खरी दिशा पंतप्रधान मोदींनी दिली आहे. ते महाराष्ट्रासह देशाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी कटिबद्ध आहेत. अमेरिका दौऱ्यावेळी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दीड तास मोदींचे भाषण ऐकले. त्यानंतर प्रभावित होऊन अमेरिकेच्या अध्यक्षांनी मोदी हे वैश्विक नेते असल्याचे जाहीर केले. त्यामुळे भारताला महासत्ता होण्यापासून आता कोणी आडवू शकत नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान मोदींची स्तुती केली.
हेही वाचा - शिवसेनेने पाच वर्षे सत्तेत असताना झोपा काढल्या का? - अजित पवार
महाराष्ट्रात 50 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली आहे. शेवटच्या पात्र शेतकऱ्याला जोपर्यंत लाभ दिला जात नाही, तोपर्यंत कर्जमाफी योजना बंद केली जाणार नाही. उत्तर महाराष्ट्राला वरदान ठरणारा नार-पार प्रकल्प येत्या पाच वर्षात पूर्ण केला जाईल. निवडणुका झाल्यानंतर पंतप्रधानांची भेट घेवून कांदा निर्यात बंदी उठवण्याची विनंती करणार असल्याचे आश्वासन फडणवीस यांनी दिले.