नाशिक - राहुल गांधी यांचे भाषण म्हणजे करमणूक असते. मुगलांना जसे संताजी-धनाजी स्वप्नात दिसत होते, तसे काँग्रेसवाल्यांना नरेंद्र मोदी स्वप्नात दिसतात. त्यामुळे ते दचकुन ऊठतात, असा हल्लाबोल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर केला. सटाणा येथे भाजप उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी फडणवीस बोलत होते.
या सभेत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, की आताची लोकसभा निवडणूक ही देशाचे भवितव्य ठरवणारी आहे. देश सुरक्षित हाती देण्याची सध्या गरज आहे. देश सुरक्षित ठेवण्याची क्षमता फक्त पंतप्रधान मोदी यांच्यामध्येच आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मोदींना पंतप्रधान करण्याची आवश्यकता आहे, असे मत व्यक्त करून त्यांनी पंतप्रधानांच्या विकासकामांचा लेखाजोखा मांडला
यावेळी काँग्रेसच्या घराणेशाहीवर त्यांनी सडकून टीका केली. आपल्या भाषणात फडणवीस हे दुष्काळ व शेतकऱ्यांच्या समस्यांवर काहीच बोलले नाहीत, त्यामुळे उपस्थित शेतकऱ्यांची नाराजी झाली. सटाणा, मालेगाव, धुळे या शहरांमध्ये शेतकऱयांना मोठ्या प्रमाणात दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री या सभेत काही ठोस आश्वासन देतील, अशी शेतकऱयांना अपेक्षा होती. मात्र, त्यांच्या पदरी निराशाच पडली.