नाशिक - लोकसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेचे कामकाज आटोपून परतताना लिपीकाचा हृदयविकाराने मृत्यू झाला. कृष्णा भरत सोनवणे, असे संबंधित लिपीकाचे नाव आहे. त्र्यंबकेश्वरहून परतताना नाशिक बस स्थानकावरच त्यांना काळाने गाठल्याने.
कृष्णा भरत सोनवणे हे लोकसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेनिमित्त त्र्यंबकेश्वर येथील नूतन इंग्लिश शाळेवर कर्तव्य बदावत होते. कर्तव्य बजावल्यानंतर सोमवारी सायंकाळी ते घरी परत निघाले होते. मात्र सीबीएस बस स्थानकाच्या आवारात चक्कर येऊन कृष्णा हे कोसळले.
त्यांना घटनास्थळावरील नागरिकांनी उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांमार्फत त्यांची नियुक्ती मतदानासाठी त्रंबकेश्वर येथे करण्यात आली होती. त्यांच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. शोकाकुल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. सोनवणे हे देवळाली येथील एसव्हीकेटी महाविद्यालयात वरिष्ठ लिपीक म्हणून कार्यरत होते. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.