नाशिक- दिंडोरी तालुक्यातील तिसगाव येथील धरणात पाणी पिण्यासाठी जात असलेल्या १५ गाई गाळामध्ये फसल्याचा प्रकार घडला. या गाईंना बाहेर काढण्यासाठी नागरिकांनी ट्रॅक्टर व क्रेनचा वापर केला. दोन तासाच्या अथक प्रयत्नानंतर गाईंना बाहेर काढण्यात नागरिकांना यश आले.
तिसगाव येथील काठेवाडी लक्ष्मण गवळी हे काल सकाळी त्यांच्या 60 गायींना चारण्यासाठी घेऊन गेले होते. त्यानंतर अकरा वाजता गवळी हे गाईंना पाणी पाजण्यासाठी तिसगाव धरणाच्या दिशेने घेऊन जात होते. मात्र, धरणाचे पाणी कमी झालेले असल्याने त्याठिकाणी गाळ साचला आहे. या गाळात १५ गाई फसल्या.
त्यानंतर गाळात फसलेल्या गाईंना सोनजांब व खेडगाव येथील शेतकरी योगेश बाळासाहेब जाधव यांनी स्वतःच्या ट्रॅक्टर व क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढले. कैलास जाधव, विश्वनाथ जाधव, रावसाहेब जाधव सुभाष जाधव, प्रवीण जाधव या शेतकऱ्यांच्या सतर्कतेमुळे पंधरा गाईंचे प्राण वाचले.