नाशिक - राज्याच्या पश्चिम किनारपट्टी भागात बुधवारी धडकलेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे किनारपट्टीसह उत्तर महाराष्ट्रात नुकसान झाले. या वादळाचा नाशिक जिल्ह्यालाही फटका बसला. मात्र, कुठेही मनुष्यहानी झालेली नाही. परंतू 56 जनावरे दगावली आहेत. 190 पक्क्या घरांचे अंशत: तर 64 कच्च्या घरांचे पूर्णत: नुकसान झाले आहे. शासनाकडून या निसर्ग चक्रीवादळामुळे मृत्यू झालेल्या जनावरांसाठी व झालेल्या अन्य वित्तीय हानीसाठी लवकरच पॅकेज जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली.
भुजबळ यांनी गुरुवारी जिल्ह्यात निसर्ग चक्रीवादळामुळे झालेले नुकसान, कोविड-19 व खरीप हंगाम पूर्व तयारी या बाबत आढावा बैठक घेतली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे, शहर पोलीस आयुक्त विश्वास नांगरे- पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक (ग्रामीण) डॉ.आरती सिंह, उपायुक्त (महसूल) दिलीप स्वामी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुरेश जगदाळे, आदी उपस्थित होते.
त्या दिवशी कोरोना हरेल..
जिल्ह्याची लोकसंख्या ही सुमारे 62 लाख एवढी आहे. 62 लाख लोकसंख्येच्या जिल्ह्यात केवळ 341 कोविड रुग्ण उपचार घेत असून त्यातील 16 रुग्ण हे ऑक्सिजनवर आहेत. तसेच केवळ 3 रुग्ण अतिदक्षता विभागात आहे त्यामुळे जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधासाठी जिल्हा प्रशासन करत असलेल्या उपाययोजना ह्या प्रभावी व यशस्वी ठरल्या आहेत. त्यामुळे लॉकडाउन शिथील करण्याच्या दिशेने शासनाने निर्णय घेतला आहे. कोरोना आजाराबाबत आता सकारात्मक विचार करुन त्याचे आजपर्यंतच्या रुग्णांची गणना करण्यापेक्षा खरोखरच आज किती रुग्ण उपचार घेत आहेत, पूर्णपणे बरे होऊन घरी गेलेले किती आहेत हे ही समाजासमोर आणण्याची जबाबदारी शासन, प्रशासन , नागरिक आणि माध्यमांचीही आहे. त्यासाठी सर्वांना ताकदीने कोरोनामुक्तीसाठी काम सुरु ठेवावे लागणार आहे. ज्या दिवशी शाळा व महाविद्यालय सुरु करण्याचा निर्णय होईल त्यादिवशी आपण जिंकलो आणि कोरोना हरला असे चित्र आपण येणाऱ्या काळात पाहू, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.