नाशिक - 'महाराष्ट्रात कोणी चाणक्य बिणक्य चालणार नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली तिन्ही पक्षाचे सरकार अत्यंत मजबुतीने उभे आहे. त्यामुळे वर्षभर प्रयत्न करून सुद्धा विरोधकांच्या हाती काही आले नाही', अशी प्रतिक्रिया राज्याचे अन्न-नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी दिली. येवला तालुका पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनासाठी छगन भुजबळ आले होते. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
अमित शाहांवर निशाणा -
देशाचे गृहमंत्री अमित शाह रविवारी सिंधुदुर्गमध्ये नारायण राणे यांच्या वैद्यकीय महाविद्यालयाचे उद्घाटन करण्यासाठी आले होते. त्यांनी या कार्यक्रमात शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. अमित शाह यांना भाजपाचे चाणक्य असे म्हटले जाते. त्यांनी केलेल्या टीकेचा समाचार घेताना भुजबळ यांनी राज्यात चाणक्यनिती चालणार असे म्हटले.
अगोदर सरकार पाडून तर दाखवा, मग शिडी पाहू -
राज्याचे विरोधी पक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकार बनवण्यासाठी शिडीची गरज भासणार नाही, असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्याचा देखील भुजबळ यांनी समाचार घेतला. 'अगोदर सरकार पाडून तर दाखवा, मग शिडी लावायची की शिडी बाँम लावायचा हे ठरवू,' असा टोला भुजबळांनी फडणवीसांना लगावला.
काय म्हणाले होते फडणवीस -
गेल्या आठवड्यात देवेंद्र फडणवीस ठाण्यातील मिरा-भाईंदर येथे एका कार्यक्रमाला आले होते. त्यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली होती. काही लोक लोकशाहीची थट्टा करतात. राज्यात नापास झालेले तीन विद्यार्थी मेरिटमध्ये आल्यासारखे सत्ता भोगत आहेत. टर्न टेबल लॅडरचा हिंदी अर्थ पासा पलटणे, असा होतो. त्याचप्रमाणे भाजपाला देखील डाव पालटायला शिडीची गरज लागणार नाही, असा इशारा महाविकास आघाडी सरकारला फडणवीस यांनी दिला होता.