नाशिक - हवामान विभागाच्या अंदाजानुसार निसर्ग चक्रीवादळ ३ किंवा ४ जूनला नाशिक जिल्ह्यात येण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील काही भागांत नागरिकांना अतिवृष्टी, गारपीट व वादळाचा फटका बसू शकतो. त्यामुळे नाशिक शहर व जिल्ह्यातील नागरिकांनी आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या सूचनांचे पालन करून सुरक्षिततेसाठी दोन दिवस घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.
हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या अंदाजानुसार निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री छगन भुजबळ हे आपत्ती व्यवस्थापन मदत आणि पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव किशोरराजे निंबाळकर, संचालक डॉ. अभय यावलकर, नाशिकचे विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी सुरज मांढरे, महापालिकाआयुक्त राधाकृष्ण गमे, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, ग्रामीण पोलीस अधिक्षक डॉ.आरती सिंह यांच्या संपर्कात असून परिस्थितीचा आढावा घेत आहेत.
भुजबळ यांनी अधिकाऱ्यांना योग्य त्या उपाययोजना करण्यातबाबत सूचना दिल्या आहेत. पालकमंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे की, हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या अंदाजानुसार निसर्ग चक्रीवादळ ३ किंवा ४ जून ला नाशिक जिल्ह्यात दाखल होऊ शकते. यामुळे जिल्ह्याच्या काही भागांत अतिवृष्टी, गारपीट व वादळाचा फटका बसू शकतो. या काळात नागरिकांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून देण्यात आलेल्या सूचनांचे पालन करावे. या वादळाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घरातच सुरक्षित रहावे, घर नादुरुस्त असल्यास किंवा पत्र्याचे असेल तर तात्काळ दुरुस्ती करावी व सुरक्षितस्थळी आवश्यक साधनसामग्री सोबत घेऊन स्थलांतरीत व्हावे. घराच्या भोवती वादळामुळे विजेचे खांब किंवा तारा, झाडे इत्यादी पडण्याची शक्यता असल्यास अशा वस्तूंपासून लांब रहावे. शेतकऱ्यांनी आपले पशुधन व अन्य पाळीव प्राणी यांना अगोदरच सुरक्षित स्थळी हलवावे किंवा आपल्या सोबत सुरक्षित करावे, असे छगन भुजबळ यांनी सांगितले. कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करतानाच, सद्यस्थितीत जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर क्वारंटाईन असलेले नागरीकांसाठी सुरक्षित स्थळे निश्चित करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
अधिक माहिती साठी व आवश्यक मदतीसाठी आपत्ती व्यवस्थापन कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक संपर्क क्रमांक 0253-2317151 व 2315080 येथे संपर्क करावा, असे आवाहन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.