नाशिक - नाशिक मतदारसंघात आज सकाळी ७ वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली. महायुतीचे हेमंत गोडसे तर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे समीर भुजबळ यांच्यात मुख्य लढत आहे. छगन भुजबळ यांनीही कुटुंबीयांसह मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले. मात्र, मतदार याद्यांमध्ये असलेल्या गोंधळाचा फटका भुजबळ कुटुंबीयांनाही बसला.
छगन भुजबळ हे त्यांच्या कुटंबीयांसह मतदान केंद्रावर पोहोचले असता त्यांचे नाव कोणत्याच यादीत सापडत नव्हते. मतदान केंद्रावर चार ठिकाणी फिरल्यानंतर शेवटी त्यांना त्यांच्या नावाची यादी सापडली. महत्वाचे म्हणजे आघाडीचे उमेदवार समीर भुजबळ यांच्या आई हिराबाई मगन भुजबळ यांचे नावच मतदार यादीतून गायब झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. छगन भुजबळ यांच्या पत्नीलाही ओळखपत्रावरील अडचणी सांगून मतदानापासून बराच वेळ रोखून धरण्यात आले होते.
यावर छगन भुजबळ यांनी संताप व्यक्त केला. हा प्रकार हेतुपुरस्सर केला जात असून मतदारांना मतदानपासून रोखण्यासाठीच हा प्रकार केल्याचा आरोपही भुजबळ यांनी केला. काही मतदारांना पाच किलोमीटर अंतरावरून परत पाठवण्यात येत आहे. मतदार याद्यांमध्ये घोळ असल्यामुळे त्याचा परिणाम मतदारांच्या मानसिकतेवर होत असून त्यामुळे मतदानाच्या टक्केवारीत घट होते, असे छगन भुजबळ यांनी सांगितले. मतदान करण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येत बाहेर पडत आहेत. मात्र, मतदार याद्यांमध्ये गोंधळ असल्याने मतदरांचा गोंधळ उडाला आहे.