नाशिक- मनमाड पालिकेच्या बजेट व सर्वसाधारण सभेत सत्ताधारी नगर सेवकांसह सर्वपक्षीय नगरसेवकांनी गोंधळ घातला आहे. साफसफाई व भाजी मार्केटचे अर्धवट काम याबाबत नगरसेवकांनी वेलमध्ये उतरून ठिय्या आंदोलन केले. यावेळी संतप्त नगरसेवकांनी अधिकाऱ्यांच्या टेबलवर कचरा टाकून संताप व्यक्त केला.
हेही वाचा- उसेन बोल्ट पेक्षाही वेगवान..! ९.५५ सेकंदात १०० मीटर अंतर पार, सोशल मीडियावर 'त्या'ची चर्चा
मनमाड नगरपालिकेत सध्या शिवसेनेची एकहाती सत्ता आहे. शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससह अपक्ष असलेल्या नगरसेवकांनी आजच्या सभेत गोंधळ घालून निदर्शने केली. यावेळी नगरसेवकांनी मुख्याधिकारी डॉ. दिलीप मेणकर यांच्या टेबलावर कचरा टाकून निषेध व्यक्त केला. शहरात स्वच्छतेचा बोजवारा वाजला असून त्याकडे लक्ष देण्याची गरज असल्याने नगरसेवकांनी आंदोलन केले.
नगरसेवकांनी व्हेलमध्ये जाऊन ठिय्या आंदोलन केले. मुख्याधिकारी व पालिका अधिकारी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असल्याची चर्चा आहे. मात्र, सफाई कामगार काम करत नसल्याचे अनेकदा निदर्शनास आले आहे. यामुळे शहरातील स्वच्छतेचा बोजवारा वाजला आहे.