नाशिक - सर्व जनता अडचणीत असताना त्यांना अडचणीतून बाहेर काढण्याची आपली जबाबदारी आहे. त्यामुळे, आपत्तीच्या काळात संवेदनशीलपणे काम करण्याची गरज आहे. यासाठी अधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी झटकून काम न करता एकमेकांना मदत करून कामे करावी, असे आदेश राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिले.
येवला तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने छगन भुजबळ यांनी अधिकाऱ्यांची तातडीने बैठक घेतली. यावेळी भुजबळ म्हणाले, की कोरोना विलगीकरण कक्षाची नियमित साफसफाई करण्यात यावी. रुग्णांना आवश्यक त्या सुविधा वेळोवेळी पुरवण्यात याव्यात. तसेच इतर आजारांचे निदान होण्यासाठी शहरातील खासगी रूग्णालये सुरू ठेवावी. पेट्रोल पंप वेळेनुसार सुरू ठेवण्यात यावे, याठिकाणी गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी, अशा सूचना बैठकीत करण्यात आल्या
शहरातील कंटेनमेंट झोनची पुनर्रचना करण्यात यावी, या संदर्भात त्यांनी जिल्हाधिऱ्यांशी चर्चा करून तात्काळ कारवाईचे आदेश दिले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येवला कार्यालय येथे ही बैठक घेतली. यावेळी आमदार नरेंद्र दराडे, किशोर दराडे, येवल्याच्या प्रांताधिकारी ज्योती कावरे, येवल्याचे तहसीलदार रोहिदास वारुळे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.