नाशिक - येवला तालुक्यातील पाटोदा ठाणगाव येथे कोरोनाचे दोन रुग्ण आढळून आल्याची अफवा पसरवणाऱ्या दोघां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऋतीक लक्ष्मळ काळे (रा. नगाडे) आणि कलीम सलीम पठाण (रा. निमगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्या तरुणांची नावे आहेत. जीवघेण्या कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातलेले असताना भारतातही कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यातच व्हॉट्स अॅपवरून कोरोनाविषयी खोटी माहिती पसरवली जात आहे. कोरोना संदर्भात खोटी माहिती किंवा अफवा पसरवणाऱ्यां विरोधात आता शासनाने कारवाईला सुरुवात केली आहे.
हेही वाचा - #corona effect : जमावबंदी नियमाचा भंग केल्याने नाशिकमध्ये पहिला गुन्हा दाखल
शासन स्तरावर कोरोना बद्दल आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत असून नागरिकांनी कोरोनाबद्दलच्या अफवांवर विश्वास ठेवू नये. तसेच कोरोनाबाबत अफवा पसरवू नये म्हणून आवाहन करण्यात येत आहे. परंतू येवला तालुक्यातील नगाडे गावातील एका तरुणाने व्हॉट्स अॅप ग्रुपवर येवला तालुक्यात पाटोदा ठाणगाव येथ कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहे, अशी अफवा असलेला खोटा मेसेज तयार करून दुसऱ्या ग्रुपवर फॉरवर्ड केला.
हेही वाचा - कोरोना इफेक्ट; जिल्ह्यातील प्रमुख मंदिरे 31 मार्चपर्यंत राहणार बंद
हाच मेसेज त्याच्या दुसऱ्या एका मित्राने पुढे फॉरवर्ड केला. अशा प्रकारची कोरोना बद्दल खोटी माहिती आणि अफवा पसरवणाऱ्या दोन्ही तरुणाची माहिती येवला तालुका पोलीस स्टेशनला मिळताच त्यांनी या दोन्ही तरुणांना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर अफवा पसरवल्याबद्दल येवला तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या दोघांचेही मोबाईल जप्त केले आहे. तालुक्यात कोरोनाबाबत कोणी खोटी अफवा पसरू नये, जेणे करून सर्वसामान्य नागरिक घाबरून जातील, असे आवाहन पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांनी केले आहे.