नाशिक - लोकसभा निवडणूक आचारसंहिता भंगाचा नाशिकमधील पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिक महानगरपालिकेच्या शाळेतील मुख्याध्यापिका विरोधातच हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिक मनपा शाळेच्या अरुणा काकड नामक मुख्याध्यापिकेने २ दिवसांपूर्वी राष्ट्रीय बाल कामगार प्रकल्प अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या शिक्षण वर्गाचे उद्घाटन आयोजित केले होते. या कार्यक्रमात राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविका कविता कर्डक यांना बोलावून त्यांच्या हस्ते या कार्यक्रमाची फीत कापल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत निवडणूक आयोगाकडे प्राप्त झालेल्या तक्रारीनंतर आयोगाने याबाबत चौकशी करून संबंधित मुख्याध्यापिकाविरोधात नाशिक पंचवटी पोलीस ठाण्यात आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
नाशिकचे अप्पर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत यांनी सांगितले, की सचिन दोंदे यांनी आचारसंहिता भंगाची तक्रार केली होती. शिक्षणाधिकारी मनपा यांच्याकडे हीच तक्रार चौकशीसाठी पाठवण्यात आली. दरम्यान, त्यांनी चौकशी केली असता त्यामध्ये असे आढळून आले की ही मनपा शाळा क्रमांक १ फुलेनगर येथे राष्ट्रीय बालकामगार प्रकल्पांतर्गत प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन करायचे होते. हे उद्घाटन माजी नगरसेविकेंच्या हस्ते करण्यात आले. ही कृती म्हणजे भारतीय निवडणूक आयोगाचे उल्लंघन आहे. त्यामुळे त्यांच्याविरूध्द कलम १८८ अन्वये पंचवटी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.