नाशिक (मनमाड) - भारतीय दूरसंचार निगमच्या मनमाड विभागातील 65 पैकी 57 कर्मचाऱ्यांनी व्हीआरएस (स्वेच्छा निवृत्ती) घेतली आहे. शुक्रवारपासून बीएसएनएल कार्यालयाचे कामकाज खासगी ठेकेदार पाहणार आहेत. त्यामुळे सेवा कशी मिळणार याबाबत हजारो टेलीफोन व ब्रॉडबँड धारकामध्ये चिंता वाढली आहे. त्यामुळे स्थापनेपासून सुरू असलेले मनमाड कार्यालयात एकच शुकशुकाट पहायला मिळाला.
हेही वाचा... बॅंक कर्मचाऱ्यांचा संप: आझाद मैदानात सभा
केंद्र शासनाने भारतीय दूर संचार निगम अर्थात बीएसएनएलचे खासगीकरण करणच्या दिशेने पाऊल उचलल्यानंतर निगमच्या हजारो कर्मचाऱ्यांना सक्तीची स्वेच्छा निवृत्ती घ्यायला लावली आहे. याचाच एक भाग म्हणून मनमाड विभागात येणाऱ्या येवला, नांदगांव आणि चांदवडच्या कार्यालयात असलेल्या 65 पैकी 57 अधिकारी, कर्मचाऱ्यांनी व्हीआरएस घेतला. शु्क्रवारी त्यांचा कार्यालयात शेवटचा दिवस होता. व्हीआरएस घेणाऱ्या कर्मचाऱ्यांमधील काहींची 3 काहींची 5 तर काहींची 8 वर्षे सेवा बाकी होती. व्हीआरएस घेतल्यानंतर पुढे काय करायचे, असा प्रश्न या कर्मचाऱ्यांना पडला आहे. खासगीकरण झाल्यामुळे ठेकेदाराकडून सेवा कशी मिळणार, असा प्रश्न हजारो टेलीफोन व ब्रॉडबँड धारकांना पडला आहे.
हेही वाचा... सहा महिन्यात दुसरा आर्थिक पाहणी अहवाल करण्यासाठी टीमचे कठोर प्रयत्न
केंद्र सरकारच्या अनेक सरकारी कंपनीच्या खासगीकरणाच्या धोरणाचा अनेकांना फटका बसत आहे. देशभरात लाखो कर्मचाऱ्यांना बेरोजगार व्हावे लागत आहे. सर्व शासकीय कंपनीमधील कर्मचाऱ्यांना स्वेच्छेने निवृत्ती घेण्यास सांगत, खासगी ठेकेदाराला हे सरकारी कार्यालय चालवण्यासाठी देण्यात येत आहे. यामुळे अनेकांना वयाच्या 50 व्या वर्षीच सेवानिवृत्त व्हावे लागत आहे. तेव्हा आता पुढील आयुष्य कसे काढायचे, असा सवाल त्यांना सतावत आहे. तर खासगी कंपनी सेवा कशी देईल, याकडे ग्राहकांचे लक्ष लागले आहे.