सटाणा (नाशिक) - दोधेश्वर येथील घाटात आज सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास चारचाकी गाडी नाल्यात कोसळली असून, या कारमध्ये एक मृतदेह असल्याची माहिती सटाणा पोलिसांना मिळाली. पोलीस घटनास्थळी गेले असता, टाटा मांझा कारच्या (क्रमांक-एमएच 04 ईए 2403) मागच्या सीटवर राजू सरदार यांचा मृतदेह आढळला. त्यांचा निघृण खून झाल्याचा पोलिसांना संशय आहे.
पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक देवेंद्र शिंदे, पोलीस उपनिरीक्षक गवई यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन तपासणी केली असता, दोधेश्वर घाटाच्या तीव्र उतारावर एक कार असलेल्या एका नाल्यामध्ये कलंडलेल्या अवस्थेत आढळून आली. या कारच्या मागील सीटवर राजू सरदार यांचा छिन्न विच्छिन्न अवस्थेतील मृतदेह पोलिसांना आढळून आला.
कारच्या सीटखाली सरदार यांचा मोबाईलदेखील आढळून आलेला आहे. डोक्यावर हत्यारांच्या सहाय्याने सरदार यांच्यावर वार करण्यात आले असून, डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. दरम्यान, रात्री साडेदहा वाजता राजू सरदार घरातून जेवण करून बाहेर पडले होते अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांना दिली आहे.
लॉकडाऊनमुळे राजू सरदार यांचे बँड साहित्याचे दुकान बंद असल्याने त्यांनी रत्नागिरी व देवगड हापूस आंब्याची घरपोच विक्रीचा व्यवसाय सुरू केला होता. सरदार यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सटाणा ग्रामीण रुग्णालयात दाखल केला आहे. अधिक तपासासाठी नाशिक येथील ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले आहे.