नाशिक - कोरोनामुळे धार्मिक स्थळे बंद असताना देखील खासगी दौऱ्यावर आलेल्या मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यासाठी नाशिकच्या नवशा गणपती मंदिराचे दरवाजे खुले करण्यात आले. त्यामुळे आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत होती. मात्र पोलिसांनी मंत्र्यांना अभय देत कार्यकर्त्यांवर कारवाई केल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल केला नाही, तर पोलीस आयुक्तालय समोर धरणे आंदोलन करू, असा इशारा भाजपा आध्यात्मिक आघाडीने दिला आहे.
'जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा दाखल करा'
गेल्या आठवड्यामध्ये राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड हे खासगी कामानिमित्त नाशिक दौऱ्यावर होते. या दौऱ्या दरम्यान त्यांनी नाशिकच्या आनंदवली भागात असलेल्या श्री नवशा गणपती मंदीरमध्ये जाऊन आरती आणि पूजा विधी केल्याने लॉकडाऊनचे नियम फक्त सर्वसामान्य जनतेसाठीचा आहेत का? असा सवाल भाजपा आघाडीने उपस्थित केला आहे. मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजपा आध्यात्मिक आघाडीच्या वतीने करण्यात आली होती. मात्र नाशिक पोलीस आयुक्तांनी कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केल्याने आता पोलिसांनी आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल केला नाही, तर पोलीस आयुक्तालय समोर धरणे आंदोलन करू, असा इशारा भाजपा आध्यात्मिक आघाडीच्या वतीने देण्यात आला आहे. शिवाय मंत्र्यांसाठी वेगळे आणि सामान्य माणसासाठी वेगळे कायदे आहेत का? असा सवालही भाजपा आध्यात्मिक आघाडीने केला आहे.