नाशिक - विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून आठवडा उलटून गेला आहे, तरी महाराष्ट्रात सरकार स्थापन झालेले नाही. महायुतीला बहुमत मिळूनदेखील शिवसेना आणि भाजपमध्ये सुरू असलेल्या वादामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. युतीमधल्या या विकोपामुळे सत्ता स्थापनेवरून अनेक राजकीय चर्चांना उधाण आले आहे. सत्ता स्थापनेसाठीच्या वेगवेगळ्या पर्यायांबाबत अनेक तर्क-वितर्क केले जात आहेत.
यासंदर्भात बोलताना, नाशिकचे पालकमंत्री आणि भाजप नेते गिरीश महाजन म्हणाले, की सत्तास्थापनेसाठी आपल्याकडे नऊ तारखेपर्यंतचा वेळ आहे. त्यामुळे भाजपची सध्या 'वेट अँड वॉच' हीच भूमीका राहणार आहे. तसेच शिवसेना नेते संजय राऊत यांनी शरद पवारांची भेट घेतली होती. त्यामुळे शिवसेना ही राष्ट्रवादीला सोबत घेऊन सत्ता स्थापन करेल काय? यासंदर्भात विचारले असता, याबद्दल आपल्याला काही माहित नसल्याचे त्यांनी सांगितले.
आम्ही सर्व फडणवीसांसोबत..
या सर्व प्रकरणादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकाकी पडले असल्याची टीका संजय राऊत यांनी केली होती. त्याबाबत बोलताना गिरीश महाजन म्हणाले, की संकटमोचक म्हणून मी कायम मुख्यमंत्र्यांसोबत आहेच, तसेच सर्व आमदारही एकत्रच आहोत. अगदी दिवाळीमध्येही मी मुंबईतच होतो. त्यामुळे मुख्यमंत्री एकटे पडलेत, असे म्हणायचे कारण नाही.
महाजन आज नाशिक दौऱ्यावर..
परतीच्या पावसामुळे बाधित झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी महाजन हे आज नाशिकच्या दौऱ्यावर येत आहेत. यात प्रामुख्याने ते निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत, पाचोरे वणी, शिरवाडे वणी तसेच चांदवड तालुक्यातील सोग्रस, दिहिवड तसेच देवळा तालुक्यातील उमराने/तिसगाव आदी गावांना भेटी देणार आहेत. त्यानंतर दुपारी ३.०० वाजता ते शेतीपिकांच्या नुकसानीबाबत सर्व संबंधित अधिकाऱ्यांसमवेत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतील.
हेही वाचा : दिल्लीतील बैठकीत सत्तास्थापनेसाठी चर्चा होईल असे वाटत नाही - जयंत पाटील