मनमाड (नाशिक) - उत्तर प्रदेशातील लखमीपूर येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडी सरकारने दिलेल्या बंदच्या हाकेला मनमाड, नांदगांव, चांदवड, येवला मालेगावसह नाशिकच्या ग्रामीण भागात उस्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. सोमवारी झालेल्या बंदमध्ये बाजार समित्याही सहभागी झाल्या होत्या. नांदगाव, मनमाड, चांदवड यासह सगळ्याच बाजार समित्या या बंदमध्ये सहभागी झाल्या होत्या. यामुळे कोट्यवधींची उलाढाल ठप्प झाली होती. व्यापारी, नागरिकांनी कडकडीत बंद पाळून निषेध केला तसेच मनमाड रेल्वे स्थानक परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला.
या बंदमध्ये सोमवारी (दि. 11) मनमाड शहरातील सर्वच दुकाने बंद ठेवण्यात आली होती. विशेष म्हणजे व्यापारी असोसिएशन तर्फे स्वयंस्फूर्तीने बंद पाळण्यात आला होता. शहरातील मुख्य बाजारपेठ यासह आजूबाजूला असलेल्या व्यवसायिकांसह मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीनेही बंदमध्ये सहभाग घेतला होता. त्यामुळे कोणत्याही प्रकारची खरेदी-विक्री सोमवारी झाली नसल्यने कोट्यवधींची उलाढाल ठप्प होती. महाविकास आघाडीतर्फे शहरातून काल सकाळी रॅली काढून या घटनेचा निषेध नोंदवण्यात आला. रेल्वे स्थानकात सुरक्षेच्या दृष्टीने कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
हेही वाचा - बीएसएनएल कंत्राटी कामगाराचा ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू; एक जखमी