नाशिक - राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी अयोध्येत राम मंदिर उभारल्याने कोरोना जाईल का? असे मत व्यक्त केले होते. त्यानंतर शरद पवारांच्या या वक्तव्याचा राज्यभरातून निषेध व्यक्त करण्यात येत असून, राज्यातील राजकारण चांगलंच तापल्याचे चित्र दिसत आहे. आज (बुधवार) शरद पवार खासदारकीची शपथ घेत असताना नाशिकमध्ये त्यांच्या या वक्तव्याच्या निषेधार्थ भारतीय जनता युवा मोर्चाच्यावतीने आंदोलन करण्यात आले.
नाशिक शहरातील एन डी पटेल रोड या ठिकाणी असलेल्या पोस्ट ऑफिसबाहेर हे आंदोलन करण्यात आले. यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी जय श्रीराम.. चलो आयोध्या अशा आशयाचे पत्र शरद पवार यांच्या मुंबई येथील निवासस्थानी पाठवले आहे. तसेच शरद पवार यांनी केलेले वक्तव्य हे सर्वांच्याच भावना दुखावणारे असल्याचा आरोप भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आला.
शरद पवार यांनी आयोध्येत राम मंदिर उभारल्याने कोरोना जाईल का? या वक्तव्याचा राज्यभरात निषेध होत आहे. त्यांच्या या वक्तव्याच्या निषेधार्थ भारतीय जनता युवा मोर्चाच्यावतीने शरद पवार यांच्या मुंबई येथील सिल्व्हर ओक या निवासस्थानी सुमारे 20 लाख पत्र पाठवण्यात येणार असल्याचे देखील यावेळी आंदोलनकर्त्यांकडून सांगण्यात आल आहे.