नाशिक - येवल्यात सलून व्यवसायिकांनी दुकानं उघडण्याची मागणी केली असून यासाठी त्यांनी काळ्या फिती बांधत राज्य सरकारचा निषेध केला. शहरातील सर्व सलून व्यावसायिकांनी बंद दुकानांबाहेर काळ्या फिती लावून आंदोलन पुकारले. येत्या 15 जून पर्यंत शासनाने सलून दुकानं उघडण्यास परवानगी न दिल्यास कायद्याविरोधात जाऊन दुकानं उघडण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. तसेच वेळप्रसंगी कुटुंबासोबत जेलभरो आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र नाभिक महामंडळाने दिलाय.
याआधी त्यांनी येवल्याच्या तहसीलदारांना निवेदन दिले होते. लॉकडाऊनच्या काळात सलून बंद ठेवायला लागल्याने कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. यासाठी राज्य सरकारच्या निषेधार्थ हातात फलक घेऊन शांततेच्या मार्गाने सरकारच्या निर्णयाचा निषेध नोंदवण्यात आला. 15 जून पर्यंत सलून दुकानं सुरू करण्याची परवानगी मिळावी, अशा मागणी त्यांनी केली. ते न केल्यास सलून व्यवसायिकांना आर्थिक मदत देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.