नाशिक - दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शेतकरी आणि औद्योगिक क्षेत्रातील कामगार संघटना आक्रमक झाल्या आहेत. येत्या काळात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने नाशिक पोलीस आयुक्तालयाच्यावतीने शिवजयंती साजरी करण्यास मनाई करण्याबाबत आदेश जारी करण्यात आले आहेत.
आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर होणार कारवाई -
येत्या काळात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या वतीने मनाई आदेश जारी करण्यात आले आहेत. यामुळे राज्यासह नाशिककरांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या शिवजयंतीच्या मिरवणुकीवर देखील निर्बध आले आहेत.
हेही वाचा - कृषी सुधारणांवर शरद पवारांनी घेतला यू टर्न - नरेंद्र मोदी
येत्या 10 फेब्रुवारी ते 24 फेब्रुवारीपर्यंत हे आदेश जारी करण्यात आले आहेत. या काळात कोणतीही मिरवणूक काढता येणार नसल्याचे तसेच सार्वजनिक ठिकाणी एकत्र येऊन घोषणाबाजी करणे, वाद्य वाजवणे, वाहनांवर झेंडे लावून शहरात फिरणे, वेळेव्यतिरिक्त फटाक्यांची आतिषबाजी करणे घंटानाद करणे, या गोष्टींवर मनाई करण्यात येत असल्याचे आदेशामध्ये नमूद करण्यात आला आहे.
शिवप्रेमी नाराज -
आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा देखील पोलिसांच्या वतीने देण्यात आला आहे. दरम्यान, एकीकडे नाशिक शहरात शिवजयंती निमित्त शिवप्रेमींनी शहरात जोरदार तयारी सुरू असताना दुसरीकडे पोलिस आयुक्तालयाच्या वतीने काढण्यात आलेल्या या आदेशामुळे शिवप्रेमी नाराजीचे वातावरण आहे.