नाशिक - जिल्ह्यातील येवला पंचायत समिती एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत बेबी केअर किटचे वाटप करण्याचे काम सुरू केले आहे. याचा ग्रामीण भागातील 1 हजार 25 बालकांना लाभ मिळणार आहे.
येवला पंचायत समितीच्या वतीने आज (बुधवार) एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प एक व दोन अंतर्गत तालुक्यात एकूण 281 अंगणवाडी केंद्रांद्वारे, शासनाने ग्रामीण भागांमध्ये जंतुसंसर्गामुळे नवजात बालकांना होणारे आजार तसेच बालमृत्यू टाळण्यासाठी, रुग्णालयात नवजात बालकांसाठी बेबी केअर किट वाटपाची योजना शासनाने सुरू केली आहे. यामध्ये 17 उपयोगी वस्तू आहेत. यामध्ये लहान बाळांचे कपडे, बेबी टॉवेल, लंगोट, हातमोजे, पायमोजे, छोटी गादी, मच्छरदाणी, छोटे ब्लॅंकेट, प्लास्टिक चटाई, मालिश तेल, लोकरीचे उबदार कापड, बॉडी वॉश, नॅपकिन, हात धुण्याचे लिक्विड, शाम्पू, खुळखुळा, नेलकटर, थर्मामीटर पिन हे सर्व साहित्य बेबी किटमध्ये शासनाकडून मिळाला आहे. येवला पंचायत समिती सभापती प्रवीण गायकवाड यांनी थेट अंगणवाडीमध्ये जाऊन या लाभार्थ्यांना साहित्याचे वाटप केले. प्राथमिक स्वरुपात तालुक्यातील कोटमगाव खुर्द, बल्हेगाव, बोकटे येथे अंगणवाडीमध्ये जाऊन किटचे वाटप करण्यात आले.
याबाबत सभापती गायकवाड म्हणाले, 'या किटमुळे गोरगरीब मुलांना आधार मिळणार आहे. सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती या सर्व वस्तू घेऊ शकत नाही. त्यामुळे शासनाच्या या किटची ग्रामीण भागांमध्ये बाळाचे आरोग्य चांगले राखण्यासाठी मोठी मदत होणार आहे. दरवर्षी हे किट मिळण्यासाठी शासनाकडे मागणी करणार आहे.'