नाशिक - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने केलेल्या लॉकडाऊनला दोन महिने झाले आहेत. सरकारने लॉकडाऊनचे काही नियम शिथिल केले असले तरी नाशिक शहरातील सार्वजनिक वाहतूक बंद आहे. त्यामुळे नाशिकच्या रिक्षा चालकांवर उपासमारीची वेळ आली. त्यामुळे आम्हाला सरकारने आर्थिक मदत करावी अशी मागणी रिक्षा चालकांनी केली आहे.
देशात करण्यात आलेला लॉकडाउनचा परिमाण सर्वच क्षेत्रावर जाणवत आहे. नाशिकमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याचे म्हणत प्रशासनाने लॉकडाऊनचे नियम शिथिल केले आहेत. मात्र नाशिक रेड झोनमध्ये असल्याने सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अद्याप बंद आहे. याचा परिणाम रिक्षा चालकांवर होत आहे. नाशिक जिल्ह्यात 20 ते 22 हजार परमिट रिक्षा असून यावर अनेकांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होतो. मात्र गेल्या दोन महिन्यापासून रिक्षा घरासमोर उभ्या असल्याने रिक्षा चालकांवर उपासमारीची वेळ आली आहे.
अनेकांच्या रिक्षावर बँकांचे कर्ज असून ते कसे फेडले जाणार असा प्रश्न त्यांना भेडसावत आहे. तसेच रोजचा घरखर्च कुठून आणायचा असा प्रश्न देखील त्यांना भेडसावत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील उद्योजकांना आत्मनिर्भर करण्यासाठी 20 लाखांचे पॅकेज जाहीर करत उद्योग व्यवसायाला दिलासा देण्याचा प्रयत्न केला. मात्र दुसरीकडे कष्ट करणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांचा यात विचार करत सरकारने आम्हाला प्रत्येकी 10 हजार रुपयांची मदत करून या वर्षाचे रिक्षावारील इन्शुरन्स माफ करावे, अशी मागणी केली आहे.