नाशिक - सातपूर परिसरातील एटीएम मशीन फोडून चोरटे पसार झाले. पैसे चोरण्याच्या प्रयत्नात असलेल्या चोरट्यांचा पंचवटी पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग केला आणि दोन चोरट्यांना ताब्यात घेतले. तसेच त्यांच्याकडून सोन्याचे दागिने आणि धारदार शास्त्र मिळाल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
सातपूर भागात पाच संशयित एका बँकेचे एटीएम फोडून पैसे चोरण्याचा प्रयत्न करत असल्याचे काही नागरिकांना दिसले. नागरिकांनी तात्काळ याची माहिती सातपूर पोलिसांनी दिली. काही वेळातच घटनास्थळी पोलीस दाखल झाले. पोलीस आल्याचे लक्षात येताच संशयितांनी बोलेरो जीपमधून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी लागलीच वायरलेसवर घटनेची माहिती शहरातील सर्व पोलीस ठाण्याला दिली. पंचवटी पोलिसांनी धुळ्याच्या दिशेने पळून जाणाऱ्या या चोरट्यांच्या बोलेरो गाडीचा पाठलाग सुरू केला. काही किलोमीटर पाठलाग करत विधाते नगर परिसरात बोलेरो गाडीला पोलिसांनी गाडी आडवी लावून दोघा संशयितांना ताब्यात घेतले. मात्र यावेळी अंधाराचा फायदा घेत तीन संशयित फरार झालेत.
दोन्ही संशियतांना सातपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. शहरामध्ये याआधी झालेल्या एटीएम फोडण्याच्या घटना पकडलेल्या संशियतांकडून समोर येण्याची शक्यता आहे. यावेळी चोरट्यांकडून धारदार शस्त्र आणि सोन्याचे दागिने मिळाल्याचे समजते. पोलिसांनी तत्परता दाखवत कर्तव्य बजावणाऱ्या सातपूर पोलीस ठाण्याचे शरद झोल आणि धोंगडे या पोलीस कर्मचाऱ्यांचे कौतुक होत आहे. त्यांच्या कार्याची दखल म्हणून पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी 25 हजारांचे बक्षीस जाहीर केले आहे.