नाशिक - लष्करी जवानाने गळा आवळून पत्नीची हत्या केल्याची घटना बुधवारी (दि. 26 फेब्रुवारी) रात्री साडे अकराच्या सुमारास घटली. हत्येनंतर जवानाने हातावर चाकूने वार करत आत्महत्येचा प्रयत्न केला. सुनिल बावा असे त्या जवानाचे नाव आहे.
श्रीनगर येथे लष्कारात कार्यरत असलेला सुनिल बावा हा दहा दिवसांपूर्वी इंद्रप्रस्थ येथील घरी आला होता. काल रात्री साडे अकराच्या सुमारास त्याचे पत्नी चैतालीसोबत भांडण झाले. यावेळी त्याने रागाच्या भरात तिचा गळा आवळला. चैतालीचा मृत्यू झाल्यानंतर त्याने कल्याण येथे राहणारा त्याचा चुलत भाऊ किशोर भरतीला फोन करून तुझी वहिणी स्वर्गात गेली, असे सांगितले.
किशोरला संशय आल्याने त्याने लगेच नाशिकच्या सिडको भागात राहणारे मुलीचे वडील प्रकाश बावा यांना माहिती कळवली. काही वेळानंतर ते मुलीच्या घरी दाखल झाले. दरवाजा ठोठावल्यानंतर आतून प्रतिसाद न मिळाल्याने जोरात हाक मारण्यास सुरुवात केली. त्यानंतर सुनिलने दार उघडले. त्यावेळी चैताली जमिनीवर पडलेली होती, तर सुनिलच्या हातावर चाकूचे वार दिसून आले. या प्रकरणी सुनिल बावा विरोधात म्हसरुळ पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा - मालेगावात माजी नगरसेवकाच्या घरावर गोळीबार, तब्बल ७ गोळ्या झाडल्या