नाशिक: छत्रपती संभाजीराजे यांच्या पत्नी संयोगिताराजे छत्रपती यांनी रामनवमीच्या दिवशी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली होती. त्यादरम्यान त्यांनी त्यांच्यासोबत घडलेल्या काळाराम मंदिर येथील घटनेचा उल्लेख केला होता. त्यावर सर्वच ठिकाणाहून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. याच मुद्द्याला घेऊन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड हे नाशिक दौऱ्यावर आले होते. काळाराम मंदिरात दर्शन घेण्यासाठी आग्रही भूमिका मांडत वेदोक्त मंत्र हीच संकल्पना आता यापुढे कायम राहावी, अशी मागणी जितेंद्र आव्हाड यांनी केलं.
संविधानाची उंची खूप आहे: शाहू महाराज पुढारलेल्या विचारांचे होते. त्यांनी वैदिक शाळा काढली होती. वेदोक्त, पुराणोक्त प्रकरण आणखी किती दिवस चालणार आहे. मी देव मानतो, मी धर्माभिमानी हिंदू आहे. संविधान प्रत मी प्रभू रामचंद्रांच्या चरणी ठेवतो असे म्हणालो होतो ही माझी चूक आहे. संविधानाची उंची खूप आहे. आम्ही संविधान डोक्यावर ठेवतो असे मत जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केले आहे. जिथे महाराष्ट्राच्या गादीचा मान नाही तिथे आमचा काय? हे महाराष्ट्र खपवून घेणार नाही. यातून काहीतरी शिका, बहुजनांना आव्हान आहे, असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले. ह्याच काळाराम मंदिरात 2 मार्च 1930 रोजी मंदीर प्रवेशासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आंदोलन केले होते. काही सनातनी आजही आमच्या पूर्वजांनी बाबासाहेबांना रोखले होते असे सनातनी धर्म परिषदेत फुशारक्या मारतात, असेही आव्हाडांनी म्हटले.
कालीचरण महाराजांची लायकी काय? कालीचारणची लायकी काय? त्याचे शिक्षण आहे काय ? भारत देशातील पहिला अतिरेकी नथुराम गोडसे आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी बद्दल बोलणारे कालीचरण महाराज कोण? असे म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी कालीचरण महाराजांवर सडकून टीका केली आहे.
आव्हाडांच्या माजी अंगरक्षकाची आत्महत्या: माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या तत्कालीन अंगरक्षकाने आत्महत्या केली होती. वैभव कदम असे या अंगरक्षकाचे नाव आहे. सिव्हील इंजिनिअर अनंत करमुसे यांना मारहाण केल्याचा आरोप कदम यांच्यावर होता. याप्रकरणी चौकशी सुरू असतानाच त्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले होते.
धक्कादायक घटना: करमुसे मारहाण प्रकरणातील आरोपी वैभव कदम यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी उघडकीस आली होती. वैभव कदम हे तत्कालीन मंत्री जितेंद्र आव्हाडांचे अंगरक्षक असताना ठाण्यातील सिव्हील इंजिनिअर अनंत करमुसे यांना आव्हाड यांच्या बंगल्यात नेऊन बेदम मारहाण केल्या प्रकरणात ते आरोपी होते.