नाशिक - जिल्ह्यात दोन दिवसापासून पावासाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे येवला तालुक्यातील अंकाई किल्ल्याच्या पायऱ्यांना अगदी धबधब्याचे स्वरुप आले आहे. त्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटक गर्दी करीत आहेत.
शिर्डी-येवला-मनमाड या मार्गावर येवला आणि मनमाडच्यामध्ये अंकाई किल्ला आहे. याच किल्ल्याच्या माथ्यापासून अगस्ती नदीचा उगम होतो. त्यामुळे पावसाळ्यात या किल्ल्यांच्या पायऱ्यांना धबधब्याचे स्वरुप प्राप्त होत असते. हेच निसर्गरम्य दृश्य बघण्यासाठी गुरुवारी पर्यटकांनी गर्दी केली होती.
अंकाई किल्ल्याच्या विस्तृत पठारावर पाण्याचे टाके, शिवलिंग, पाण्याचा तलाव आहे. तसेच याठिकाणी असलेल्या जैन धर्मियांची लेणी पाहण्यासाठी पावसाळ्यात मोठ्याप्रमाणात पर्यटक येत असतात.