नाशिक - महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे. त्यामुळे सरकारने कोरोना निर्बंधात शिथिलता देण्यास सुरू केले आहे. त्यानुसार, येत्या 15 ऑगस्टपासून हॉटेल, मॉल सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. मात्र दुसरीकडे धार्मिकस्थळांवरील निर्बंध कायम राहणार आहेत. त्यामुळे धर्मिक स्थळांवर अवलंबून असलेले व्यवसाय अडचणीत आले आहेत. त्यामुळे लवकरात लवकर धार्मिक स्थळं सुरू करावी, अशी मागणी अनिकेत धर्मगुरू अनिकेत शास्त्री महाराज यांनी केली आहे.
आर्थिक पॅकेज जाहीर करावे
धार्मिक नगरी म्हणून नाशिक शहराची ओळख आहे. नाशिकमध्ये शेकडो पुरातन मंदिरं आहेत. नाशिकला वेगळा अध्यात्मिक इतिहास आहे. याच नाशिकमध्ये दरवर्षी लाखो भाविक येत असतात. यामुळे धार्मिक पर्यटनाची उलाढाल मोठ्या प्रमाणावर होत असते. अशात कोरोनामुळे मागील दोन वर्षांपासून धार्मिक स्थळं बंद आहेत. त्यामुळे यावर अवलंबून असलेले व्यवसाय ठप्प झाले आहेत. परिणामी व्यवसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. सरकारने ज्याप्रमाणे इतर व्यवसायिकांना उभारी देण्यासाठी आर्थिक पॅकेज जाहीर केले आहे. त्याप्रमाणे धार्मिक स्थळांवर अवलंबून असलेल्या व्यवसायिकांसाठीही पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी अनिकेत शास्त्री महाराज यांनी केली आहे.
प्रशासनाला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा भीती
नाशिक शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी कोरोनाची तिसरी लाट येईल, अशी भीती प्रशासनाला आहे. त्यामुळे धार्मिक स्थळं खुली करण्याबाबत अद्याप निर्णय घेण्यात आला नाही. मंदिरात भाविकांची गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाने मंदिरं बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री त्र्यंबकेश्वर मंदिरात बाराही महिने भाविकांची मोठी गर्दी होत असते. महराष्ट्रातून नाही तर देशभरातील भाविक रोज हजारोच्या संख्येनं मंदिरात येत असतात. तसेच नारायण नागबलीसारखा धार्मिक विधी करण्यासाठी भाविकांची गर्दी मंदिर परिसरात होत असते.
'परवानगी द्या, सर्व खबरदारी घेऊ'
'कोरोना काळात सरकारने काही निर्बंध घालून धार्मिक स्थळं खुली करण्यास परवानगी द्यावी. मंदिरात गर्दी होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ. मंदिरात गर्दी होऊ नये यासाठी दिवसभरातून फक्त एक हजार भाविकांना दर्शन देण्याची सोय करू. मंदिरात प्रवेश करताना भाविकांना मास्क वापरणे बंधनकारक करू. मंदिराबाहेर भाविकांची तपासणी, हात सॅनिटाईझ करू. त्यानंतर त्यांना मंदिरात प्रवेश दिला जाईल. तसेच मंदिर व परिसर स्वच्छतेसोबत दिवसातून तीन वेळा सॅनिटाईझ करण्यात येईल', असं श्री त्र्यंबकेश्वर मंदिर ट्रस्टने म्हटले आहे.
नाशिक जिल्ह्यात देवीच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेले सप्तशृंगी मातेचे मंदिर आहे. चांदवड येथील प्राचिन रेणूका माता मंदिर, नाशिकच्या पंचवटी परिसरातील प्राचीन काळाराम मंदिर, श्री कपालेश्वर महादेव मंदिर, भगूर येथील रेणूका माता मंदिर बंद आहे. त्यामुळे येथे व्यवसाय ठप्प आहेत.
हेही वाचा - मुंबईत डेल्टाप्लस रुग्णाचा मृत्यू; दोनदा लस घेतल्यानंतरही अंत