नाशिक - 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या'च्या गजरात नाशिकमध्ये गणेश विसर्जन सुरू आहे. नाशिककर आपल्या लाडक्या गणरायाला वाजत-गाजत निरोप देत आहेत. नाशिक महानगरपालिकेकडून दरवर्षीप्रमाणे या वर्षीही गणेश मूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात आली आहे.
शहरातील सहा विभागात 26 कृत्रिम तलाव तयार करण्यात आले आहेत. सोबतच निर्माल्य संकल करण्यासाठी गाड्यांची व्यवस्था केली आहे. या व्यतिरिक्त गोदावरी नदीच्या उपनद्यांमध्ये गणेश विसर्जनासाठी काही नैसर्गिक ठिकाणेही निश्चित करण्यात आली आहेत.
हेही वाचा - बाप्पा निघाले गावाला...'देव द्या, देवपण घ्या'; नाशिककरांचा स्तुत्य उपक्रम
गणेश मूर्ती दान करून प्रदूषण विरोधी उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन महानगरपालिका भाविकांना करत आहे. नाशिक शहरातून दरवर्षी दोन लाखापेक्षा जास्त लहान-मोठ्या गणेश मूर्ती विसर्जित केल्या जातात. मूर्ती विसर्जनासाठी गोदावरी, वाघाडी, वालदेवी, दारणा, नासर्डी या नद्यांचा वापर केला जातो.
प्रतिष्ठापना केलेल्या अनेक मूर्ती प्लास्टर ऑफ पॅरिसच्या असतात. या मूर्ती पाण्यात लवकर विरघळत नाहीत. परिणामी नद्यांचे व पर्यावरणाचे प्रदूषण होते. नाशिक महानगरपालिकेच्या वतीने दरवर्षी मूर्तीदान कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो मूर्ती जमा केल्या जातात. महानगरपालिकेच्या या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.
गणेश विसर्जनासाठी तयार केलेले कृत्रिम तलाव -
1) नाशिक पूर्व - शिवाजी वाडी पूल, साईनाथ नगर चौफुला, इंदिरानगर, कलानगर चौक
2) नाशिक पश्चिम - चोपडा लॉन्स, येवलेकर मळा, मसोबा मंदिर, लायन्स क्लब पंडित कॉलनी
3) सातपूर - सोमेश्वर मंदिर, गंगापूर रोड, पाईपलाईन रोड, अशोक नगर
4) सिडको - डे केअर स्कूल, पवन नगर स्टेडिअम
5) पंचवटी - पेठ रोड, दत्त चौक, गोरक्षा नगर, कोणार्क नगर, रामकुंड, तपोवन, कपिला संगम
6) नाशिक रोड - नाशिक महानगरपालिका शाळा क्रमांक 123, नारायण बापू चौक