नाशिक - दिंडोरी येथील महावितरण कंपनीच्या सहायक अभियंत्यांनी मडकीजाम येथील शेतकऱ्यास शिवीगाळ व मारहाण करण्याची धमकी दिल्याचा ऑडिओ रेकॉर्डिंग व्हायरल झाल्यानंतर शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. याप्रकरणी सर्व पक्षीय संघटनेसह शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करत नाशिक-दिंडोरी रस्त्यावर रास्ता रोको करत निषेध व्यक्त केला आहे.
आंदोलनाची महावितरणने घेतली दखल, अधिकाऱ्याला पाठवले सक्तीच्या रजेवर
शेतकऱ्यांनी अचानक रास्ता रोको करत निषेध करून संबंधित अधिकाऱ्यास त्वरित निलंबित करावे व कारवाई करावी, अशी मागणी शेतकरी वर्गाने आंदोलना दरम्यान केली आहे. त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवत चौकशी करून दोन दिवसात निलंबन करण्याचे आश्वासन वीज मंडळाचे कार्यकारी अभियंता राजाराम डोंगरे अधीक्षक अभियंता प्रवीण दरोली उपअभियंता राऊत यांनी दिल्यानंतर पावणेतीन तासानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे.
अधिकाऱ्याचे त्वरित निलंबन करावे ,गुन्हा दाखल करत कारवाई करावी
मडकीजांब येथील निवृत्ती भास्कर बोराडे या शेतकऱ्यांनी वीज बिल भरले आहे. तरी वीज जोडून द्या यासाठी महावितरणचे सहाय्यक अभियंता बोरकर यांना फोन केला असता सदर अधिकाऱ्यांनी अर्वाच्य शिवीगाळ व मारहाणीची धमकी दिल्याचा आरोप बोराडे यानी केला असून या शिवीगाळ प्रकरणाचे फोन ऑडिओ रेकॉर्डिंग व्हायरल झाले आहे. व्हायरल झालेल्या ऑडिओ रेकॉर्डिंग आणि महावितरण अधिकाऱ्याचा शेतकऱ्यांनी निषेध व्यक्त करत आज दुपारच्या समारास नाशिक-दिंडोरी पालखेड चौफुलीवर रास्ता रोको केला. या अधिकाऱ्याचे त्वरित निलंबन करावे व गुन्हा दाखल करत कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. यात सर्वपक्षीय नेते सहभागी झाले शेतकऱ्यांनी केलेल्या रास्ता रोकोमुळे यावेळी वाहनांच्या लांबच रांगा लागल्या होत्या प्रवाशांचे मोठे हाल झाले.
हेही वाचा - नाशिक; खंडणीच्या वादातून जाळल्या चायनीज गाड्या; दोन संशयित ताब्यात