नाशिक - नाशिक शहरातून कोरोना लसीकरणाला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत असताना शासनाकडून लस उपलब्ध होत नसल्याने मुंबईने काढलेल्या ग्लोबल टेंडरिंगमधेच नाशिकचा समावेश करण्याचा प्रयत्न पालिका प्रशासना करणार आहे. मंगळवारी पालिका आयुक्त महापौर आणि सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांमध्ये झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
वेगळे टेंडर काढल्यास प्रक्रिया रखडण्याची शक्यता -
नाशिक शहरात झालेला लसीकरण मोहिमेचा खोळंबा पाहता आता नाशिक महापालिका प्रशासनानेदेखील मुंबई, पुणे आणि ठाणे पाठोपाठ ग्लोबल टेंडर काढून लस्सी खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. नाशिक शहरातून लसीकरण मोहिमेला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे. मात्र, शासनाकडून लस उपलब्ध होण्यास विलंब होत असल्याने आयुक्त, महापौर आणि सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन संगनमताने ग्लोबल टेंडर काढून लस खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. लस खरेदीसाठी वेगळे टेंडर काढण्यात प्रकिया रखडण्याची शक्यता असल्याने मुंबईने काढलेला ग्लोबल टेंडरमध्ये नाशिकचा समावेश करण्याचा प्रयत्न असल्याचे आयुक्त कैलास जाधव यांनी यावेळी सांगितले.
18 ते 44 वयोगटातील नागरिक लसीकरण होणे गरजेचे -
18 ते 44 वयोगटातील नागरिक सर्वाधिक प्रमाणावर घराबाहेर पडत असल्याने त्यांचे लसीकरण होणे गरजेचे आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने ग्लोबल टेंडर काढून लस खरेदी करण्याचा निर्णय घेतला असून यामुळे शहरातील लसीकरण मोहिमेला गती मिळणार असल्याचे मत महापौर सतीश कुलकर्णी यांनी व्यक्त केले आहे. नाशिक शहराची लोकसंख्या सुमारे 20 लाख असून तीन लाख नागरीकांना डोस देण्यात आले आहेत. केंद्र आणि राज्य सरकारकडून आणखी पाच लाख लसींचे डोस मिळण्याची शक्यता आहे. कोरोनाची संभाव्य तिसरी लाट आणि सध्या लसीकरणासाठी नागरीकांची हेाणारी धावपळ लक्षात घेता अशाप्रकारे लस खरेदीसाठी महापालिकेनेच ग्लोबल टेंडर काढावे, यासाठी आयुक्तांच्या दालनात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असल्याचे महापौरांनी सांगितले.
मुंबई महापालिकेच्या होकारावर नाशिकचे नियोजन अवलंबून -
दरम्यान, लस खरेदीसाठी वेगळे टेंडर काढण्यात प्रकिया रखडण्याची शक्यता असल्याने मुंबईने काढलेला ग्लोबल टेंडरमध्ये नाशिकचा समावेश करण्याचा प्रयत्न पालिका प्रशासनाकडून केला जाणार आहे. पाच लाख लसींची खरेदी करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने केला असून यात कोविशील्ड आणि कोव्हक्सीन व्यतिरिक्त लस उपलब्ध व्हावी, याकरिता प्रयत्न केले जाणार आहे. यामध्ये स्फुटनिक आणि फायझर या लसींना प्राधान्य देण्यात येणार आहे. मात्र, मुंबई महापालिकेच्या होकारानंतरच नाशिकच्या लस खरेदीचे पुढील नियोजन अवलंबून आहे. त्यामुळे आता मुंबई महापालिका नाशिकला ग्लोबल टेंडरमध्ये समाविष्ट करून घेणार का, याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा - यूपी सरकार आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या दाव्यांची 'ईटीव्ही भारत'कडून पोलखोल..