नाशिक - पेट्रोल आणि डिझेलचे दर सातत्याने वाढत असल्याने, या दरवाढीचा निषेध करण्यासाठी आज आम आदमी पक्षाच्या वतीने नाशिक शहरात केंद्र शासनाचा निषेध करण्यासाठी धक्का मोरो आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी वाहनांना धक्का मारत सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
पेट्रोल, डिझेलचे दर आटोक्यात आणण्याची आंदोलकांची मागणी
काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. सध्या पेट्रोलचे दर हे 92 रुपये प्रति लिटर वर जाऊन पोहोचले असून, डिझेलच्या दर देखील 90 रुपयांवर पोहोचले आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीस आले आहेत. दरम्यान पेट्रोल आणि डिझेलचे वाढते दर नियंत्रणात आणावे या मागणीसाठी सोमवारी आम आदमी पक्षाच्या वतीने नाशिकच्या पंचवटी कारंजा ते मालेगाव स्टँड परिसरात वाहनांना धक्का मारून धक्का मारो आंदोलन करण्यात आले. यावेळी पेट्रोल दरवाढीचा निषेध नोंदवत केंद्रशासनाने यावर लवकरात लवकर उपाययोजना करून हे वाढते दर नियंत्रणात आणण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे.
आंदोलकांकडून तीव्र आंदोलनाचा इशारा
आंदोलकांनी केंद्र शासनाच्या धोरणांविरोधात जोरदार घोषणाबाजी करत रोष व्यक्त केला, तसेच लवकरात लवकर पेट्रोल आणि डिझेलचे दर नियंत्रणात आणून, सर्वसामान्यांना दिलासा द्यावा अन्यथा येत्या काळात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील यावेळी देण्यात आला आहे. यावेळी आम आदमी पक्षाचे नाशिक शहरातील विविध पदाधिकारी कार्यकर्ते तसेच सर्वसामान्य नाशिककर उपस्थित होते.