नाशिक- जिल्हा शासकीय रुग्णालयात कोरोनाचा संशयित रुग्ण दाखल झाला आहे. यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वी ही व्यक्ती दुबईहून नाशिकला आली होती. त्यानंतर त्याची प्रकृती ढासळली. त्यामुळे कुटुंबाने या व्यक्तीला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.
दुबईहून आलेल्या या व्यक्तीला अचानक खोकला, ताप, डोके दुखी आणि दम लागत असल्याने कुटुंबातील सदस्यांनी नाशिक रोड येथील महानगर पालिकेच्या बिटको रुग्णालयात दाखल केल होते. मात्र, या व्यक्तीला त्रास अधिक वाटू लागल्याने नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयातील कोरोना वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर रुग्णाच्या थुंकीचे नमुने पुण्यातील प्रयोगशाळेमध्ये पाठवले जाणार आहे. रिपोर्ट आल्यानंतरच रुग्णावर योग्य ते उपचार केले जातील, अशी माहिती जिल्हा शासकीय रुग्णालयाने दिली आहे.
याआधी देखील जिल्हा शासकीय रुग्णालयात परदेशवारी करून आलेल्या तीन संशयित रुग्णांना दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले. एकूणच प्रशासन कोरोना व्हायरसबाबत गंभीर असून आतापर्यंत जिल्ह्यात परदेशातून आलेल्या २२ जणांची तपासणी सातत्याने केली जात असल्याचे जिल्हा शासकीय रुग्णालयाने सांगितले आहे. तसेच, एखादा व्यक्ती परदेशातून आला असल्यास त्याची माहिती जिल्हा रुग्णालयाला कळवावे, असे आवाहनही जिल्हा शासकीय रुग्णालयाने केले आहे.
हेही वाचा- पालिका स्थायी समिती सभापती निवडणूक निकाल; उच्च न्यायालयात होणार जाहीर