नाशिक - दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथील शेतकऱ्यांच्या मुलांनी कोरोनाच्या संकटावर मात करत एक अभिनव उपक्रम चालू केला आहे. त्यांनी परिसरातील शेतकऱ्यांचा ताजा भाजीपाला योग्य दरात विकत घेऊन, पॅकिंग करुन तो मुबंई, ठाणे, कल्याण, पुणे, नाशिक या ठिकाणी पाठवला आहे. स्वामी समर्थ फार्ममार्फत पॅकिंग करुन भाजीपाला थेट ग्राहकांना घरपोच मिळत आहे. यामध्ये 18 ते 20 प्रकारचा भाजीपाला आहे. याबद्दल दिंडोरी लोकसभेच्या खासदार भारती पवार यांनी प्रत्यक्ष भेट देऊन या युवकांचे अभिनंदन केले.
गोपीनाथ मुंडे अटल नाविन्यपूर्ण बहुउद्देशीय सहकारी संस्था मर्यादित जानोरी संस्थेच्या युवकांनी एकत्र येत शेतकऱ्यांनकडून योग्य भावात भाजीपाला खरेदी केला. तो थेट ग्राहकांना कमी दरात घरपोच पॅकिंग करून मिळत आहे. सुरूवातीला हे युवक आपल्या परिसरातील शेतकऱ्यांशी संपर्क करून शेतकऱ्यांचा ताजा भाजीपाला खरेदी करून तो भाजीपाला एका ठिकाणी जमा करून प्रत्येक मालाची अर्धा ते एक किलोची पॅकींग करून ते एका मोठया बॉक्समध्ये पॅक करायचे. या बॉक्समध्ये अठरा ते वीस प्रकारचे भाजीपाला पॅक केला जातो. त्यामध्ये भोपळा, वांगी, कारले, गिलके, बटाटे, फ्लावर, हिरवी मिरची, शिमला मिरची, शेवगा, गाजर, चिकू, आले, लसूण, लींबू, कोथिंबीर, कांदा असे अनेक प्रकारच्या भाजीपाल्याची पॅकिंग करून मुबंई, ठाणे, कल्याण, पुणे, नाशिक या ठिकाणी सोसायटीमध्ये पाठविला जातो.
भाजीपाला मागणी करायची पद्धत
पहिल्या दिवशी ऑनलाईन मागणी करून ऑनलाईन पैसे पाठवणे नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ग्राहकांना घरपोच भाजीपाला दिला जातो. त्यामुळे नागरिकांना घराबाहेर जावे लागत नाही. यामुळे नागरिकांना घरपोच भाजीपाला मिळू लागला आणि शेतकरी वर्गाला दोन पैसे मिळू लागल्याने या युवकांचे परिसरात कौतुक केले जात आहे
याकामी दिंडोरी लोकसभेच्या खासदार भारती पवार, आमदार देवयानी फरांदे, उपसरपंच गणेश तिडके, विष्णपंत काठे, संस्थेचे संचालक योगेश तिडके आदींचे मार्गदर्शन लाभले.