नाशिक - सुरत येथील आगीच्या दुर्घटनेनंतर नाशिकमधील काही खासगी क्लासेसमधील फायर सेफ्टी यंत्रणांची नाशिक महानगरपालिकेच्या फायर सेफ्टी विभागाने पाहणी केली असता एक धक्कादायक वास्तव समोर आले आहे. नाशिकमधील 90 टक्क्यांहून अधिक क्लासेसमध्ये कोणत्याही प्रकारची फायर सेफ्टी यंत्रणा नसल्याचे आढळून आले. त्यामुळे क्लासेसवाले मुलांच्या जीवाशीच खेळ खेळत असल्याचे समोर आले आहे.
सुरत येथे झालेल्या कोचिंग क्लासेसमधील आग दुर्घटनेत अनेक निष्पाप मुलांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. या घटनेनंतर देशभरातून हळहळही व्यक्त करण्यात आली, मात्र या ठिकाणी आग प्रतिबंधक यंत्रणा असती तर अनेक निष्पाप विद्यार्थ्यांचे जीव वाचले असते. या घटनेनंतर नाशिक महापालिकेने नाशिक शहरातील अशाच काही खासगी क्लासेसमधील फायर सेफ्टी यंत्रणांची पाहणी केली असता नाशिकमधील खासगी क्लास चालकांकडून विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचे वास्तव समोर आले आहे. नाशिक शहरातील अशोक स्तंभ, गोळे कॉलनी परिसरात अनेक क्लासेस आहेत. मात्र, यातील 90 टक्के क्लासेसमध्ये कोणत्याही प्रकारची फायर सेफ्टी यंत्रणा नसल्याचे दिसून आले.
पालिका आयुक्तांनी अशा खासगी क्लासेसमधील फायर सेफ्टीची पाहणी करण्याचे आदेश अग्निशमन विभागाला दिले आहेत. विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये घेऊन विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या या क्लासेस चालकांवर पालिका प्रशासन काय कारवाई करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.