नाशिक : तालुक्यातील पोहाणे येथे राहत असलेला कृष्णा सोनवणे (वय 9) वर्षाचा मुलगा 16 जुलै रोजी दुपारी दोघा मित्रांसह घराशेजारी खेळत होता. काही वेळानंतर कृष्णा एका मित्रासह तिथून दुसरीकडे निघून गेला. त्यानंतर सायंकाळपर्यंत तो घरी न परतल्याने त्याचा शोध सुरू झाला. मात्र, तो कोठेही आढळून आला नाही. त्यामुळे त्याचे अपहरण झाल्याची तक्रार वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्यात देण्यात आली होती.
मातीच्या ढिगाऱ्यात आढळला मृतदेह : दोन दिवसांनी १८ जुलै रोजी त्याचा मृतदेह पोहाणे गावच्या शिवारात आढळून आला होता. त्याचा मृतदेह मातीच्या ढिगाऱ्यात पुरलेल्या अवस्थेत आढळल्याने नरबळीची शंका व्यक्त केली जात होती. यासंदर्भात माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तहसीलदार नितीशकुमार देवरे यांच्या उपस्थितीत पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी धुळे वैद्यकीय रुग्णालयात पाठविला.
गळा चिरून हत्या : या घटनेत मुलाचा गळा कापलेला आढळून आला, तसेच मृतदेहासोबत पुरलेला चाकूही सापडला आहे. कृष्णा अमावस्येच्या दिवशी बेपत्ता झाला होता. त्याच्या डोक्यावरील केसही काढल्याचे आढळून आल्याने हा नरबळीचा प्रकार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरू केला असून याप्रकरणी पाच संशयितांनाही अटक करण्यात आली आहे.
गुप्तधनासाठी नरबळी : घटनेचे गांभीर्य ओळखून ग्रामीण पोलीस अधीक्षक शिवाजी उमाप यांनी तातडीने तपास करण्याच्या सूचना दिल्या. यानंतर पोलिसांनी श्वानपथक, फिंगरप्रिंट टीम, फॉरेन्सिक टीमला घटनास्थळी पाचारण केले. श्वानपथक, स्थानिक गुन्हे शाखा, आणि वडनेर खाकुर्डी पोलिसांच्या मदतीने पाच संशयितांना पोहणे गावातून अटक केली आहे. उमाजी गुलाब मोरे, रमेश लक्ष्मण सोनवणे, रोमा बापू मोरे, गणेश लक्ष्मण सोनवणे, लक्ष्मण नवल सोनवणे असे संशयितांची नावे आहेत. विहिरीजवळ गुप्तधनासाठी मुलाचा बळी दिल्याची कबुली संशयितांनी दिल्याचे पोलीस अधीक्षक शिवाजी उमाप यांनी सांगितले आहे.
हेही वाचा -