नाशिक - राज्य भरात परतीच्या पावसाने आपला मुक्काम वाढवला आहे. काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडत आहे. देवगाव परिसरात सतत कोसळणाऱ्या पावसामुळे घराची भिंत कोसळून वृद्धेचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेत कलावती माधव लोहारकर (वय, ७५) असे मृत महिलेचे नाव आहे.
मानोरी रस्त्यालगत राहणाऱ्या राजेंद्र माधव लोहारकर यांच्या घराची भिंत गुरूवारी रात्री कोसळली. त्यावेळी लोहारकर कुटुंबीय घरात झोपलेले होते. या घटनेची माहिती मिळताच शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी ढिगाऱ्याखाली अडकलेल्या चौघांना तत्काळ बाहेर काढले. राजेंद्र लोहारकर यांची आई, पत्नी, भावजयी आणि मुलगी गंभीर जखमी झाल्या. नागरिकांनी उपचारांसाठी जखमींना प्राथमिक आरोग्य केद्रात दाखल केले.
हेही वाचा - दिंडोरी: सेनेला 'ओळख ना पाळख' असलेला उमेदवार अन् गटबाजी भोवली, राष्ट्रवादी ठरली वरचढ
कलावती लोहारकर यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांना निफाड येथे हलवण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पंचनामा मंडल अधिकारी के. पी. केवारे, तलाठी दिपक किर्डे ,पोलीस पाटील सुनिल बोचरे, कोतवाल निवृत्ती तासकर यांनी या घटनेचा पंचनामा केला.