नाशिक - बोरगड येथील न्यू ग्रेस अकॅडमी येथील ७४ विद्यार्थ्यांना अचानक अंगावर खाज सुटून त्यातील काहींना चक्कर आल्याने सर्वांना नाशिकच्या शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. वैद्यकीय अधिकारी त्यांच्यावर उपचार करत आहेत.
शाळा सुरु असताना अचानकच विद्यार्थ्यांचे अंग खाजवून काहींना उलट्यांचा त्रास होऊ लागला. यामध्ये एका शिक्षिकेचादेखील समावेश आहे. विद्यार्थी जेवत असताना किंवा पाण्याने हात धुवत असताना कशाची तरी अॅलर्जी झाली असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.
खाज सुटल्याने आणि चक्कर आल्याने इयत्ता चौथी ते सहावीच्या एकूण ७४ विद्यार्थ्यांना उपचारासाठी शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयातील वैद्यकीय अधिकार्यांच्या पथकाने सर्वांची तपासणी केली असून त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत. सध्या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे बालरोगतज्ज्ञ विठ्ठल काळे यांनी सांगितले.