येवला - येवला बस आगारातील 7 कर्मचारी निलंबित केले. यात 3 वाहक व 4 चालकांचा समावेश आहे. कर्मचारी ऐन दिवाळीत कामावर हजर नसल्याने आगारातील फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. तसेच मुंबई येथे बेस्ट सेवेसाठी काही कर्मचारी गेलेच नाहीत. या सर्व 7 कर्मचाऱ्यांनी कामाला दांडी मारल्याने त्यांना निलंबित करण्यात आले आहे.
दीड लाख रुपयांचे नुकसान -
‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे ब्रीदवाक्य घेऊन फायदा असो वा तोटा, प्रवाशांची सेवा करणाऱ्या एसटी महामंडळाला कोरोनामुळे तोटा सहन करावा लागत आहे. मात्र आता कर्मचाऱ्यांमुळे देखील महामंडळाला आर्थिक फटका बसला आहे. कर्मचारी कामावर हजर नसल्याने ऐन दिवाळीत दीड लाख रुपयाच्या उत्पन्नावर महामंडळाला पाणी सोडावे लागले आहे. त्यामुळे येवला आगारातील सात कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.
तर एसटी महामंडळ व बेस्ट यांच्यात झालेल्या प्रासंगिक करारानुसार बेस्टच्या कामासाठी चालक व वाहक यांची नियुक्ती करण्यात करण्यात येते. यात येवला आगारातील चालक व वाहक यांचा समावेश होता. मात्र काही कर्मचारी मुंबईला गेलेच नाहीत. तर काहीजणांनी येवला आगाराच्या सेवेला दांडी मारली. त्यामुळे येवला आगाराच्या सात कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.
कोरोनाची भीती-
मुंबईहून परतल्यानंतर काही कर्मचाऱ्यांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आले होते. त्यामुळे अनेकजण भीतीपोटी ड्युटीवर जात नाहीत. तर काहीनी कुठलीही अडचण नसताना कामावर दांड्या मारल्या. त्यामुळे आगार प्रमुखांनी ही निलंबनाची कारवाई केली आहे.
हेही वाचा- तीन सख्ख्या भावांचा विहिरीत बुडून मृत्यू; जालना जिल्ह्यातील घटना
हेही वाचा- जम्मू काश्मीर : नागोर्ता टोल प्लाझाजवळ चकमक; चार दहशतवाद्यांचा खात्मा