नाशिक - कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या मालेगावात आता परिस्थिती काहीशी बदलताना दिसून येत आहे. गेल्या दोन दिवसात मालेगावमधिल 7 कोरोनाबधितांनी कोरोनवर मात केली असून 500 हुन अधिक संभाव्य व्यक्तींचे रिपोर्ट्स निगेटिव्ह आल्याने प्रशासनासह जिल्हावासियांना दिलासा मिळाला आहे.
मालेगाव शहरात कोरोना बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसून येत आहे. यामुळे प्रशासन या वाढत्या आकड्याला रोखण्यासाठी विविध पर्यायांचा अवलंब करताना दिसून येत आहे. अशातच गेल्या दोन दिवसात मालेगावमधील 7 कोरोनाबाधित रुग्ण कोरोनामुक्त झाले. तर, सुमारे 500 पेक्षा अधिक संभाव्यांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आणि प्रशासनाला दिलासा मिळाला.
दरम्यान आगामी काळात मालेगाव कोरोनामुक्त होईल असा विश्वास जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी व्यक्त केला आहे. तर, कोरोना या अदृश्य शत्रू विरोधातच्या या लढाईत पोलीस हे सीमेवरील जवानांसारखे लढा देत असून त्यांना सहकार्य करण्याचे आवाहन ग्रामीण जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. आरती सिंग यांनी केले. तसेच, कोरोनावर मात करता येऊ शकते फक्त कोरोना सदृश्य लक्षणे आढळल्यास नागरिकांनी घाबरून घरातच न बसता तपासणीसाठी पुढे येण्याचं आवाहन राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी केले.
मालेगावमध्ये कोरोनाचा आलेख जरी वाढता असला तरी रुग्णांच्या कोरोनामुक्त होण्याचा आलेखही आता वाढताना दिसत आहे. तर, संशयितांचे रिपोर्ट्स निगेटिव्ह येत असल्याने मालेगावकारांसह प्रशासनाला दिलासा मिळाला आहे. मात्र, तरीही कोरोना जोपर्यंत पूर्णपणे हद्दपार होत नाही. तोपर्यंत मालेगाववासियांनी प्रशासनाला सहकार्य करण्याची गरज आहे.