नाशिक : शहरासह जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये मागील दोन आठवड्यांमध्ये अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. वादळी वाऱ्यासह गारपीटही झाल्यामुळे नुकसानीमध्ये अधिकच भर पडली आहे. एप्रिल महिन्यात कडक उन्हाळा असतो. मात्र यावर्षी अवकाळी पावसाने दोन आठवडे हजेरी लावली. यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे. नाशिक जिल्ह्यातील 780 गावे बाधित झाली आहेत. जवळपास 66 हजार 923 शेतकऱ्यांच्या शेत पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. तर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे काही शेती पिकांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत.
कांदा पिकाचे मोठे नुकसान : मागील 30 दिवसात नाशिक जिल्ह्यात 41 मिलिमीटर इतका अवकाळी पाऊस झाल्याची नोंद झाली आहे. या कालावधीत जिल्ह्यातील सर्वच 15 तालुक्यांमध्ये पाऊस झाला, यामुळे 37 हजार 931 हेक्टर वरील पिकांची हानी झाली आहे. यात सर्वाधिक 30 हजार 256 हेक्टर क्षेत्रावरील कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच 2 हजार 645 हेक्टरवरील द्राक्ष बागाही उध्वस्त झाल्या आहेत, यासोबतच पालेभाज्या आणि फळभाज्यांचेही मोठे नुकसान झाले आहे.
शेतीचे नुकसान हेक्टरी : द्राक्ष-2 हजार 645 तर, कांदा- 30 हजार 265, गहू- 723, डाळिंब -997,आंबा-500, टोमॅटो 326, बाजरी 226, आंबा 500 इतके नुकसान झाले आहे. तसेच तालुका निहाय बाधित शेतकरी यांचे देखील नुकसान झाले आहे. यामध्ये मालेगाव 1 हजार 466, सटाणा 34 हजार 645, नांदगाव 12 हजार 752, कळवण 1 हजार 634, देवळा 634, दिंडोरी 3 हजार 65, पेठ 356, इगतपुरी 1 हजार 969, त्र्यंबकेश्वर 77, नाशिक 1 हजार 175, येवला 15, चांदवड 3 हजार 179, सिन्नर 637, निफाड 3 हजार 26 इतके नुकसान झाले आहे. तर पावसामुळे शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
हेही वाचा: Unseasonal Rain नाशिक जिल्ह्यात गारांचा अवकाळी पाऊस रब्बी पिकांचे मोठे नुकसान