नाशिक - कांद्यासोबत भेळ-भत्त्यावर ताव मारून चोरट्यांनी अंतापूर येथून ४० गोणी कांदा चोरून नेला. चोरट्यांच्या या कारणाम्यामुळे शेतकऱ्याला जवळपास १ लाख २५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. मुस्ताक शेख असे नुकसान झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
कांद्याला सोन्यासारखा भाव आल्याने चोरट्यांनी आपला मोर्चा कांदा चोरीकडे वळविला आहे. बागलाण तालुक्यातील ताहाराबाद-अंतापूर रस्त्यावर रावेर शिवारातील गट नंबर २३ मधील रस्त्यालगत मुस्ताक शेख यांची कांद्याची चाळ आहे. यात त्यांनी काही कांदा राखून ठेवला होता. अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास चाळीत प्रवेश करून प्रथम सोबत आणलेल्या भेळ भत्त्यावर ताव मारला व नंतर चाळीत साठवून ठेवलेल्या ६२ कांदा गोणींपैकी ४० गोणी कांदा सोबत आणलेल्या वाहनात टाकून पोबारा केला.
दुसऱ्या दिवशी सकाळी शेख शेतात आल्यानंतर त्यांना लोखंडी गेटची साखळी व कुलूप तोडून कांद्याची चोरी झाल्याचे लक्षात आले. चोरट्यांनी खाललेल्या पोत्यातील मुरमुरे व कांद्याची टरफले पडलेली त्यांना आढळून आली. त्यांनी या घटनेबाबत पोलिसांना माहिती दिली. याआधी अंतापूर-मुल्हेर रस्त्यावरील आनंदा लाला गवळी यांच्या गट नंबर ३४७ मध्ये उभ्या असलेल्या दोन ट्रॅक्टरच्या बॅटरी, संजय पान पाटील यांच्या विस शेळ्या, साहेबराव साताळे यांची एक मोटरसायकल, यांच्यासह अनेक शेती उपयोगी साहित्य चोरीस गेले आहे. आधीच शेतकरी अवकाळी पावसाच्या नुकसानीमुळे आर्थिक संकटात सापडले असतानाच चोरटे आता कांदे व शेती उपयोगी साहित्य व उत्पादने चोरी करू लागल्याने शेतकरी हैराण झाले आहेत.
हेही वाचा- आदित्य ठाकरेंचा नाशिक दौरा; ओला दुष्काळ जाहीर करण्याची शेतकऱ्यांची मागणी