नाशिक - 'पाणी फाउंडेशन अभियानाचे काम करणाऱ्या नागरिकांवर चांदवड तालुक्यातील डोंगरगाव येथील आदिवासी जमावाने केला हल्ला केल्याची घटना मतेवाडीत घडली आहे. या हल्ल्यात चार जण गंभीर जखमी झाले असून अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे नागरिकांनी भयभीत होऊन तेथून पळ काढला. जखमींवर चांदवड येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या घटनेची माहिती मिळताच चांदवडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन साळुंके यांच्यासह पोलीस कर्मचारी दंगल नियंत्रण पथक घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर त्यांनी तेथील जमावर नियंत्रण मिळवले आहे.
वाहनांचीही जाळपोळ-तोडफोड-
चांदवड तालुक्यातील मतेवाडी येथील वनविभागाच्या हद्दीत स्थानिक नागरिक पाणी फाउंडेशन अंतर्गत जल व्यवस्थेचे काम करत होते. याच वेळी वनविभागाच्या हद्दीत अतिक्रमण केलेल्या दीडशे ते दोनशे आदिवासी नागरिकांनी या नागरिकांवर दगडफेक करत हल्ला केला. या हल्ल्यात चार जण गंभीर जखमी झाले असून हल्लेखोरांनी सात मोटरसायकल जाळून टाकल्या आहेत. तसेच चर खोदणाऱ्या पोकलॅण्डची तोडफोड केली आहे. तर पाणी फाउंडेशनच्या एका कार्यकर्त्याला कुऱ्हाडीच्या सहाय्याने मारहान केली आहे. या हल्ल्यात भाऊराव चव्हाण ,संतोष बबन मते ,सुरेखा मते ,मुन्ना शहा पोकलँड चालक यांच्यासह इतर काही जण जखमी झाले आहेत.