नाशिक - नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दिंडोरी रोडवरील मुख्य बाजार आवारात येणाऱ्या शेतकरी, हमाल, मापारी, व्यापारी यांची मनपाच्या माध्यमातून मंगळवार (ता.२५) पासून अँटिजन टेस्ट सुरू करण्यात आल्या आहेत. बाजार समितीत येणाऱ्या घटकांना अडचणीचे ठरू नये यासाठी प्रवेशद्वारावरच अँटिजन टेस्ट करण्यात येत असून आज ३४४ टेस्ट झाल्या असून ४ पॉझिटिव्ह आले आहेत.
उपचारासाठी मेरी येथील कोरोना सेंटरवर रवानगी
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत नाशिक शहरासह जिल्हाभरातून पालेभाज्याची आवक होत असते. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नाशिकमध्ये ता.१२ ते २३ मे पर्यंत कडक लॉकडाऊन केले होते. यात बाजार समित्याही बंद ठेवण्यात आल्या होत्या. मात्र सोमवार (ता.२३) पासून निर्बंध शिथिल करीत बाजार समित्या नियमाचे पालन करीत सूरु करण्यात आल्या. त्यामुळे होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन कृषी उत्पन्न बाजार समिती व नाशिक महापालिकेच्या माध्यमातून मंगळवार (ता.२५) रॅपिड अँटिजन टेस्ट सेल हॉल क्रमांक एक मध्ये सुरू केली होती. शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी बुधवार (ता.२६ ) रोजी बाजार समितीची प्रवेशद्वारावर हलविण्यात आले. गुरुवार (ता.२७) पावेतो ३४४ टेस्ट झाल्या असून ४ पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्हना पुढील उपचारासाठी मेरी येथील कोरोना सेंटरवर रवानगी करण्यात येत आहेत.
दिंडोरी व पेठ रोडवर शेतमाल विक्री सुरूच
बाजार समितीमध्ये नियमांचे पालन करीत शेतमाल लिलावांस परवानगी देण्यात आली आहे. अनेक शेतकरी बाजार समितीत प्रवेश करीत नाहीत. अजूनही अनेक जण दिंडोरी रोड वरील बाजार समितीच्या लगत रस्त्यावर व शरदचंद्र जी पवार मार्केट यार्ड पेठरोडवरच रस्त्यावरच शेतमाल विक्री करताना दिसत आहेत. त्यामुळे आता बाजार समिती समोरील रस्त्यांवर गर्दी दिसू येतं आहे. यामुळे शेतकऱ्याचा शेतमाल मातीमोल भावात विक्री करत आहेत यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. शेतकऱ्यांनी ठरलेल्या वेळापत्रकानुसार बाजार समितीतच शेतमाल विक्री करावा, जेणेकरून त्यांची फसवणूकही टळेल आणि लुटही थांबेल, असे आवाहन बाजार समितीचे सभापती देवीदास पिंगळे यांनी केले आहे.
कोरोना अहवाल पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण केवळ दोन टक्के
शेतकरी, व्यापारी, आडते, हमाल, मापारी यांच्यासह बाजार समिती कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने मनपाच्या सहकार्याने बाजार समितीमध्ये अँटिजेन टेस्ट सुरू करण्यात आल्या आहेत. यामध्ये कोरोना अहवाल पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण केवळ दोन टक्के आहे. ही दिलासा देणारी बाब असली तरी यापुढे सर्वच बाजार घटकांनी अशाचप्रकारे बाजार समिती प्रशासनाला सहकार्य केल्यास हे प्रमाण शून्यावर यायला वेळ लागणार नाही असे सभापती देवीदास पिंगळे यांनी सांगितले आहे.