नाशिक : जिल्ह्यात गेल्या 15 दिवसांपासून सातत्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. गेल्या पाच दिवसांपासून दररोज 2 हजारहून अधिक नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आहेत. 22 मार्च रोजी आतापर्यंतचे सर्वाधिक 2779 रुग्ण आढळून आले असून 12 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 2696 जणांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला. जिल्ह्यात सध्या 16987 जणांवर उपचार सुरू आहेत.
नाशिकमध्ये दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. मुंबई, पुणे, नागपूरपाठोपाठ सर्वधिक रुग्ण नाशिक जिल्ह्यात आढळून येत असून रोज 2 हजारहून अधिक नवीन रुग्णांची भर पडत असल्याने चिंता वाढली आहे. नाशिक जिल्ह्यात सध्या 16987 रुग्ण उपचार घेत असून ह्यातील 14 हजारहून अधिक रुग्ण होम क्वांरटाइन राहून उपचार घेत आहेत.
अंशतः लॉकडाऊन
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी व्हावा यासाठी जिल्हा प्रशासनाने 10 मार्चपासून सार्वजनिक कार्यक्रम तसेच दुकानांवर निर्बंध घातले आहेत. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सोडून इतर दुकाने सायंकाळी सात ते सकाळी सातपर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच शनिवार आणि रविवार या दोन दिवशी सर्व दुकाने पूर्णतः बंद करण्यात येत आहे. तसेच महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने विनामास्क रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. मात्र तरिही कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने होत असल्याचे दिसून येत आहे.
घराबाहेर फिरणाऱ्या होम क्वारन्टाईन व्यक्तिंवर कारवाईची मागणी
नाशिक जिल्ह्यात सध्या 14 हजारांहून अधिक रुग्ण हे घरात होम क्वांरटाईन होऊन उपचार घेत आहेत. मात्र यातील काही रुग्ण घराबाहेर पडत असल्याच्या तक्रारी नाशिक महानगरपालिकेला प्राप्त होत आहे. शिक्का असतानासुद्धा होम क्वांरटाइन व्यक्ती घराबाहेर दिसल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी होत आहे.