नाशिक - येवला तालुक्यातील महालखेडा येथे २७ वर्षीय महिलेचा खून झाला असून या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे. मुखेड शिव रस्तालगत महालखेडा शिवारात राहणाऱ्या एका २७ वर्षाच्या महिलेचा मध्यरात्री हत्या करण्यात आली.
कल्पना अशोक सोनवणे (वय २७) असे मृत महिलेचे नाव आहे. त्या महालखेडे शिवारात एकट्याच वास्तव्यास होत्या.
मध्यरात्री अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर हल्ला केला. तीक्ष्ण हत्याराने जबर मारहाण झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. यामुळेच महिलेचा मृत्यू झाला आहे. मात्र कारण अद्याप अस्पष्ट आहे. याप्रकरणी विविध कंगोरे असल्याने पोलीस वेगवेगळ्या अंगांनी तपास करत आहेत.
घटनास्थळी फॉरेन्सिक टिम व स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दाखल झाले आहे. त्यांनी खुनाच्या ठिकाणावरील नमुने घेतले आहेत. या घटनेची माहिती मिळताच मालेगावचे अप्पर पोलीस अधीक्षक संदीप घुगे तसेच मनमाड विभागाचे उपअधीक्षक समीरसिंग साळवे यांनी घटनास्थळी भेट दिली. तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक एकनाथ भिसे, उज्वलसिंग राजपूत आदींनी गुन्हा झालेल्या ठिकाणाची तपासणी केली.
याप्रकरणी येवला तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात मारेकऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून उपनिरीक्षक एस.व्ही. शिंदे अधिक तपास करत आहेत.