नाशिक - एटीएम केंद्रामध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या शिक्षिकेच्या एटीएम कार्डची अदलाबदल करून खात्यातून २० हजार रुपये काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जिल्ह्यातील इगतपुरी येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएममध्ये ही घटना घडली. याप्रकरणी इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इगतपुरी जवळील के. पी. जी महाविद्यालय येथे कार्यरत असलेल्या शिक्षिका अर्चना धोंगडे या दुपारच्या सुमारास शहरातील जुन्या मुंबई-आग्रा रस्त्यावर असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेल्या होत्या. एटीएममधून पैसे निघत नव्हते. त्यावेळी एटीएम केंद्रात असलेल्या ३ अनोळखी व्यक्तींनी मिनी स्टेटमेंट काढून घ्या, असे सांगितले. स्टेटमेंट काढले असता, २४ हजार ६१८ रुपये शिल्लक असल्याचे त्या अज्ञात व्यक्तींनी अर्चना यांना सांगितले. त्यानंतर त्यांचे एटीएम कार्ड त्यांच्या हातात दिले.
एसबीआयच्या एटीएममध्ये पैसे निघत नसल्याच्या गैरसमजातून अर्चना थोड्याच वेळात स्वतःचे खाते असलेल्या महाराष्ट्र बँकेत पैसे काढण्यासाठी गेल्या. तत्पूर्वी त्यांच्या मोबाईलवर खात्यातून २० हजार रुपये काढल्याचा मॅसेज आला. त्यांनी तत्काळ आपले एटीएम महाराष्ट्र बँकेच्या कर्मचाऱ्यांना दाखवले असता, त्यांनी हे तुमचे एटीएम कार्ड नसल्याचे सांगितले. हे ऐकताच धोंगडे यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. यावर त्यांनी तत्काळ इगतपुरी पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांच्या तक्रारीवरून पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी पुढील तपास करीत आहेत.
एटीएममधून पैसे काढण्यासाठी घ्यावयाची काळजी -
- एटीएम मध्ये जाताना आपला एटीएम कार्ड कोणाला देऊ नये
- एटीएममधून पैसे निघत नसेल तर थेट बँकेशी संपर्क साधावा
- पिनकोड कोणाला दिसणार नाही या पद्धतीने पिनकोड टाकावा
- सीसीटीव्ही आणि सुरक्षा रक्षक असलेल्या एटीएम मशीनचाच वापर करावा.