नाशिक - मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढत असून ऑक्टोबर महिन्यात तब्बल 190 जणांना डेंग्यूची लागण झाली आहे. जानेवारी ते 31 ऑक्टोबरपर्यंत 549 डेंग्यू संशयित रूग्ण आढळले असून चार संशयित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. डेंग्यूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
सप्टेंबर महिन्याच्या पंधरवड्यापर्यंत शहरात 105 तर ऑगस्ट महिन्यात 120 डेंग्यू संशयित रुग्ण अढळून आले. हीच संख्या ऑक्टोबर महिन्यात 702 संशयित रुग्णांची झाली. यातील 190 जणांना डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले, महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाकडून दिल्या गेलेल्या माहिती नुसार शहराच्या विविध सरकारी, खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे.पावसाळा लांबल्यामुळे पाणी साचून डासांची मोठ्या प्रमाणात निर्मिती होत आहे. महानगरपालिकेच्या वतीने डास निर्मूलनासाठी फवारणी आणि साफसफाई कायम सुरू असल्याचा दावा असला तरी या कामात अनियमितता असल्याच्या अनेक तक्रारी होत आहे. 1 जानेवारी ते 31 ऑक्टोबर या दहा महिन्यात तब्बल 1 हजार 947 डेंग्यू सदृश्य रुग्णांची तपासणी करण्यात आली असून 549 जणांना डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तर या 11 महिन्यात चार जणांचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला आहे. थंडी, ताप, उलटी, डोकं दुखणे हे लक्षण दिसून आल्यास नागरिकांनी वैद्यकीय सल्ला घ्यावा, असे आवाहन जिल्हा शासकीय रुग्णालयाकडून करण्यात आले आहे.